
दोडामार्ग : गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या बेळगावच्या चार पैकी दोन पर्यटकांत वाद होऊन मारामारी झाल्याची घटना विजघर घाटीवडे येथे घडली. यात एजाज अस्लम खान, वय ३२, रा. आजमनगर, जि. बेळगाव जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गगन कुमार तिगडी, १९, रा. गणाचारी गल्ली, खडे बाजार, बेळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
एजाज अस्लम खान, गगन कुमार तिगडी व गगन कुमारचे दोन मित्र असे एकूण चौघेजण मंगळवारी सकाळी एजाजच्या कारने बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांनी दारू प्यायली व घाटीवडे गावाच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला कार थांबवून पहाटेच्या सुमारास आराम करू लागले. सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास गगन कुमार याने एजाजला 'आपण आता जास्त वेळ आराम करायला नको. पुढे गोव्याला जाऊ' असे सांगितले. मात्र एजाजने नको म्हणत अजून थोडा वेळ आराम करूया असे म्हणाला. या गोष्टीवरून दोघात वाद झाले. गगन कुमारने चिडून एजाजला बिअरच्या रिकाम्या बाटलीने मारहाण करून जखमी केले. एजाजला साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
याबाबतची फिर्याद एजाज खानने दिली असून संशयित आरोपी गगन कुमार तिगडी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद नाईक करत आहेत.