
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक जडणघडणीत लोकमान्य ट्रस्टचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मिळवलेले यश महाविद्यालयीन जीवनातही टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स हे दर्जेदार शिक्षण देणारे आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया भक्कम करणारे महाविद्यालय आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले.
लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित फ्रेशर्स पार्टी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत होते. यावेळी प्राचार्य यशोधन गवस यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अमोल चव्हाण पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी ताण-तणाव न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून शालेय जीवनातील यश महाविद्यालयीन जीवनातही कायम राखावे. तसेच अध्यक्षीय मनोगतात ॲड. संतोष सावंत यांनी संबोधित केले. बिझनेस मॅनेजमेंटची निवड करून विद्यार्थ्यांनी करिअरची योग्य दिशा निवडली आहे. मेहनत, शिस्त, सकारात्मक विचार आणि व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर यशस्वी करिअर घडविताना पालक, शिक्षक व संस्थेचा आदर राखावा असे सांगितले.











