स्वातंत्र्यसैनिक कै. जयानंद मठकर व्याख्यानमाला ७ एप्रिलपासून

जयानंद मठकर स्मृती पुरस्कारांचंही वितरण
Edited by: विनायक गांवस
Published on: April 01, 2025 13:15 PM
views 69  views

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वातंत्र्यसैनिक कै. जयानंद मठकर व्याख्यानमाला-२०२५' ही ७ ते १२ एप्रिल दरम्यान सावंतवाडी येथे होणार आहे. व्याख्यानमालेचा उद्द्घाटन सोहळा सोमवारी ७ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कारांचे वितरण होणार आहे अशी माहिती श्रीराम वाचन मंदिरचे सदस्य प्रा. प्रवीण बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. बांदेकर पुढे म्हणाले, स्वातंत्र्यसैनिक कै. जयानंद मठकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेत ज्ञान आणि विचारांचा अनोखा संगम साधला जाणार आहे. अनेक दिग्गज विचारवंत आणि साहित्यिक यावेळी विचार मांडणार आहेत तरुण पिढीला त्यांचे विचार व कार्याची ओळख करून देणे तसेच समाजातील विविध विषयांवर विचारमंथन घडवून आणणे हे या व्याख्यानमालेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. यावर्षीचा कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्राचार्य अल्ताफ खान उत्तम वाचक पुरस्कार प्रा. डॉ. शरयू आसोलकर (सावंतवाडी) यांना आणि प्रा. पांडुरंग येजरे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार संजय वेतुरेकर (कुडाळ) यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. बांदेकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, सहकार्यवाह बाळ बोर्डेकर उपस्थित होते. यंदापासून प्रा. अल्ताफ खान, पांडुरंग येजरे यांच्या नावे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. तर कै. जयानंद मठकर यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने यापूर्वी मधु मंगेश कर्णिक, कमलताई परुळेकर यांना सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 


दरम्यान, या व्याख्यानमालेत विविध विषयांवर नामवंत विचारवंत आणि साहित्यिक विचार मांडणार आहेत. मंगळवार, ८ एप्रिल रोजी 'जुने जाऊ द्या मरणालागूनी' या विषयावर लेखक आणि सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख (पुणे) याचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी सतीश लळीत असतील. बुधवार बुधवार, ९ एप्रिल रोजी 'वाचन आणि भवतालभान' या विषयावर कवी गणेश विसपुते (पुणे) यांचे व्याख्यान होईल. या सत्राच्या अध्यक्षपदी कणकवलीतील प्रसाद घाणेकर हे असतील. गुरुवार, १० एप्रिल रोजी डॉ. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली 'सायबर संस्कृती आणि समकाल' या विषयावर डॉ. रमेश वरखेडे (नाशिक) यांचे व्याख्यान होईल. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी प्रा. गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ दीपक पवार (मुंबई) यांचे 'भाषेचे राजकारण आणि राजकारण्यांची भाषा' या विषयावर व्याख्यान होईल. तर शनिवार १२ एप्रिल रोजी अॅड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ श्रीरंग गायकवाड (कोल्हापूर) यांचे वारकरी चळवळ-इतिहास आणि वर्तमान या विषयावर व्याख्यान होईल.


व्याख्यानमालेच्या कालावधीत ७ते १२ एप्रिलपर्यंत ग्रंथालयाच्या नियतकालिक विभागाची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राहील. व्याख्यान दररोज सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. या व्याख्यानमालेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन, सावंतवाडीच्या आयोजकांनी केले आहे. या व्याख्यानमालेतून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास प्रा. बांदेकर यांनी व्यक्त केला आहे.