
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हयात शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्याकरिता तालुकानिहाय पाठ्यपुस्तकांचे वितरण बुधवारपासून सुरु करण्यात आले आहे.
पहिली ते आठवीतील कोणताही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये, त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती राहावी. गळतीचे प्रमाण शून्यावर यावे, यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरु केली आहे.
या योजनेअंतर्गत् या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या पुस्तकांचे तालुकानिहाय वितरण बुधवारपासून विभागीय पाठ्यपुस्तके भांडार शिरोली येथून सुरु करण्यात आले आहे.
यावेळी बालभारतीचे सहाय्यक व्यवस्थापक, किशोर पाटील, व सहाय्यक सचिन जाधव, समग्र शिक्षा कार्यक्रमाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीम. स्मिता नलावडे, श्रीम. हेमांगी जोशी, विषयतज्ज्ञ, कुडाळ, शिवशंकर तेली, विशेष शिक्षक, सावंतवाडी, प्रदिप तांबे, विषयतज्ज्ञ, कणकवली, नितीन पाटील विशेष शिक्षक, मालवण असे तालुक्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तालुका निहाय पाठ्यपुस्तक संच संख्या
सावंतवाडी ११०१६, मालवण ६१६९, कणकवली १०३२३, कुडाळ ११७९७,देवगड ८८३०, वेंगुर्ले ४९८८,वैभववाडी ३००४,दोडामार्ग २५९७ मिळून एकुण ५८ हजार ७२४ एवढी पुस्तके वितरित करण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.