मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी मोफत सेवा केंद्र

वेंगुर्ले शहर शिवसेनेचा उपक्रम
Edited by: दिपेश परब
Published on: August 13, 2024 10:38 AM
views 339  views

वेंगुर्ले  :  महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री या योजनेचा लाभ तळागाळातील जनतेला होण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वयोवृद्धांचे वयोश्री योजनेचे अर्ज मोफत भरून त्यांना या योजनेचा लाभ देण्याबाबत केलेल्या सूचनानुसार वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे वेंगुर्ला हायस्कूल नजीकच्या दत्तराज नर्सरी येथे या योजनेचे फॉर्म मोफत भरण्यासाठीचे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. या कार्यालयाचा शुभारंभ शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश यांच्या हस्ते व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे तालुका समन्वयक सुहास मोचेमाडकर यांच्या कडे ८० जेष्ठ महिला व पुरुष नागरिकांचे अर्ज परिपूर्ण भरुन सादर करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यात शहर युवक प्रमुख संतोष परब, महिला शहर संघटक अँड. श्रद्धा बाविस्कर-परब, मनाली परब, अल्पसंख्यांक महिला शहर संघटक शबाना शेख, शाहिस्ता शेख, सना शेख, प्रभाकर पडते, बाळा परब, संजय परब, राजू परब, यशवंत किनळेकर, किरण कुबल यांचा समावेश होता. या शिबिरात लाभार्थ्यांचे अर्ज परिपूर्ण होण्यासाठी खास सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे तालुका समन्वयक सुहास मोचेमाडकर हे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सर्वसामान्य लोकांसह वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी वनश्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ घेणाऱ्या वयोवृद्धांना प्रतिवर्षी रुपये ३ हजार हे वस्तू खरेदीसाठी लाभार्थीच्या बँक खात्यात पाठविले जाणार आहेत. या योजनेचा वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील ६५ वर्षावरील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले.

या मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी आधारकार्ड, मतदान कार्ड किंवा वयाबाबतचा पुरावा, आधारकार्ड लिंक असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र, बीपीएल/ एपीएल खालील रेशन कार्डची झेरॉक्स असे कागदपत्र लागणार आहेत. अशी माहिती यावेळी शिवसेना वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी दिली.

सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने किंवा उपकरणे खरेदी करता येणार आहेत. उदा. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदींसाठी या योजनेचे पैसे खर्च करता येणार आहेत. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे अशी माहिती समाज कल्याण विभागाचे तालुका समन्वयक सुहास मोचेमाडकर यांनी दिली.