अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुलांना सोडवा

परशुराम उपरकर यांचे पालकांना आवाहन
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 14, 2022 19:38 PM
views 215  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या मोठया प्रमाणावर दारू, गुटख्यानंतर आता गांजा, अफू, व्हाईट पावडर, हेरॉईन सारख्या घातक अंमली पदार्थांची छुपी विक्री सुरु झाली आहे. त्यात  तरुण तरुणी या अंंमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागल्याने भावी पिढी बरबाद होण्याचा धोका आहे. यासाठी पालकांनी आत्ताच सावध होत एकत्रित येऊन या विरोधात पावले उचलण्याची गरज असल्याचे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकांना केले आहे.

सिंधुदुर्गात गोवा, कर्नाटक आणि आता मुंबई येथून दोडामार्ग, सावंतवाडी, कणकवली, मालवण, देवगड तालुक्यात छुप्या पद्धतीने अशा अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची धक्कादायक चर्चा होत आहे. कांही तरुण एजंट एमडी, हेरॉईन सारखी पावडर आणून मालवण सारख्या पर्यटन शहरात विकत आहेत. त्यातून जास्त पैसा मिळू लागल्यामुळे एजंटांचा वावर वाढला आहे.

कांही एजंट पाठीला सॅक लावून मोटरसायकलने अशा जीवघेण्या पदार्थाची विक्री करीत आहेत. तर कांही मुंबईस्थित व्यक्ती नियमित सिंधुदुर्गात ये जा करीत या धंद्यात उतरले आहेत.अशीही जोरदार चर्चा जनमानसात सुरु आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कांही तरुण तरुणी अशा अंमली पदार्थांच्या सेवनामुळे नशेत धुंद होऊन ती न मिळाल्यास आत्महत्या, चोरीमारी सारखे प्रकार करण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या कांही दिवसात तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून ते अशा प्रकारच्या अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आहारी गेल्याचेही बोलले जात आहे.

म्हणून आपली तरुण मुले मुली अशाप्रकारच्या व्यसनात फसली जाऊ नयेत यासाठी जिल्ह्यातील सर्वं पालकांनी जागृत होऊन आवाज उठवला पाहिजे. याबाबत पोलिसांकडून कडक कारवाई होण्यासाठी आम्ही मनसेतर्फे लवकरच मोर्च्याचे आयोजन करणार असून त्यामधेही पालकांनी व सर्वं सामाजिक संघटनानी सहभागी होऊन जिल्ह्यात फोफाऊ पाहणारी किड वेळीच ठेचली पाहिजे असे आवाहन मनसेचे सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.