
कुडाळ : कर्करोगाचे लवकर निदान होऊन त्यावर तातडीने उपचार करता यावेत, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेली मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी पणदूर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही व्हॅन उपलब्ध असेल.
या शिबिरात मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांच्या निदानासाठी मोफत तपासणी केली जाणार आहे. या मोबाईल व्हॅनमध्ये स्त्रीरोग तज्ञ आणि दंत शल्यचिकित्सक उपस्थित राहणार आहेत.
शिबिरात होणाऱ्या तपासण्या:
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग : यासाठी पॅप स्मीअर (pap smear) आणि व्हीआयए (VIA) तपासणी.
मुखाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग : निदानासाठी बायोप्सी.
इतर तपासण्या : मोफत रक्त तपासणी, रक्तदाब, ब्लड शुगर तपासणी, मोफत ईसीजी तपासणी.
गेल्या काही वर्षांत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, उशिरा निदान झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांना वेळेत निदान व उपचार मिळावेत या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले आधार कार्ड, आभा कार्ड (असल्यास) आणि आधार लिंक असलेला मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. पणदूर पंचक्रोशीतील नागरिक तसेच कर्करोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता पराडकर यांनी केले आहे.