अदखलपात्र गुन्ह्यातली चारचाकी बेळगावातून घेतली ताब्यात..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 18, 2023 17:19 PM
views 676  views

सिंधुदुर्ग : ओरोस पोलीस ठाण्यात  दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी गाडी नं MH07 AG7274 ही कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर कौलापुर येथील वाघा धोंडी पाटिल यांचे शेतातून सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस हवालदार पी एस गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

ओरोस पोलीस ठाण्यात भादवी  403 अन्वये 16 जून 2023 रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचे तपासासाठी न्यायालयाकडून परवानगी घेण्यात आली होती. सुरुवातीला आरोपीचे लोकेशन बेळगाव, कोल्हापूर, गोवा याप्रमाणे सतत बदलत असल्याने सदर ठिकाणी तपास टीम पाठविण्याची पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचेकडे परवानगी मागण्यात आली होती. त्याप्रमाणे  26 जुलै 2023 रोजी परवानगी मिळाली होती. परंतु त्यानंतर आरोपीचे लोकेशन उत्तरप्रदेश, बिहार असे मिळत असल्याने तपासासाठी टीम पाठविता आलेली नव्हती.मात्र, सध्या गुन्ह्यातील वाहन MH-07/AG-7274 हि वागामास्तर रा.पिरणवाडी ता.कावलापुर जिल्हा बेळगाव, पोलीस स्टेशन बेळगाव ग्रामीण हद्दीत असल्याचे समजुन आल्याने या गाडीचा व आरोपीचा शोध घेणे करिता ओरोस पोलीस ठाण्याचे पथक हवालदार पी एस गोसावी यांचेसह  16 नोव्हेंबर 2023 रोजी बेळगाव येथे पाठविण्यात आले होते. त्याप्रमाणे हवालदार पी एस गोसावी यांनी या गाडीचा शोध घेतला असता सबंधित गाडी ही वाघा धोंडी पाटिल रा.कौलापुर ता.खानापुर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांचे शेतात उभी करून ठेवलेली दिसुन आली. त्याबाबत त्यांचेकडे  विचारणा केली असता ही गाडी जानोबा पाटील याने आणून ठेवलेली असून त्याबाबत आपणास काही माहिती नाही असे सांगितले. ही गाडी ताब्यात घेऊन आज (शुक्रवार) पोलीस ठाणे येथे आणलेली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी सांगितले.