किल्ले संवर्धनातून पर्यटनाला चालना देणार : पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Edited by:
Published on: January 27, 2024 05:31 AM
views 154  views

सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला परिसरात नौसेना दिन साजरा झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या राजकोट किल्लाची पुर्नबांधणी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा 43 फुट उंच पुतळा उभारण्यात आल्याने येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. राजकोटच्या धर्तीवर जिल्ह्यातील गड-किल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याचा उपक्रम शासन राबवित आहे. या चळवळीमध्ये नागरिकांनी देखील सहभागी होऊन सहकार्य करावे. मालवण परिसरातील मोरयाचा धोंडा या स्थळाचे संवर्धन करण्यात येत असून कामाला सुरूवात झालेली आहे. पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातच होणार असून या प्रकल्पासाठी पुरेसा निधी दिला जाणार आहे. अशा नवनवीन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटनात वाढ होऊन तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जिल्हा विकासाकडे घोडदौड करत असून आपला जिल्हा सर्व क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम येथील जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यानंतर पोलिसांचे संचलन आणि शालेय विद्यार्थ्यांसह कलावंताचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. याप्रसंगी श्री चव्हाण यांनी उपस्थितांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले,  भारतवासीयांना 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी स्वतंत्र भारताची धुरा सांभाळण्यासाठी कायदे-नियमांच्या चौकटीचे महत्व व लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणून प्रजेची सत्ता सुरू झाली 26 जानेवारी 1950 रोजीच्या राज्यघटना अंमलबजावणीपासून. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाची जागतिक पातळीवर सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील आपण अभिमानाने संबोधतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक अशा राज्य घटनेचा आपण 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकार केला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.  जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यात अनेक विकासात्मक कामे केली जात आहेत. सन 2024-2025 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेसाठी  शासनस्तरावरुन 155 कोटी रुपयांचा नियतव्यव कळवला असून अतिरिक्त मागणी 145 कोटींसह एकूण 300 कोटींचा आराखडा शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठविलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधेत वाढ होऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 85 वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगांना 5 कोटी 8   लाख रक्कमेची  कर्ज मंजुरी व 1 कोटी 87 लाख रुपयांचे अर्थ साहाय्य देण्यात आले आहे.  5 बचतगटांच्या अन्न  प्रक्रिया उद्योगांना 20 लाख कर्ज मंजुरी आणि 7 कोटी 64  लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. 2 मार्च रोजी श्री देवी भराडी माता आंगणेवाडीची यात्रा  संपन्न होणार आहे. यात्रेसाठी कायमस्वरुपी प्रसाधनगृह बांधण्यासाठी 2 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली होती व  हे काम पूर्णही झालेले आहे. सिंधुदुर्गनगरीतील नवीन शासकिय वैद्यकिय महाविद्यालय बांधण्यासाठी 4 कोटी 27 लाख इतक्या रक्कमेच्या कामाला प्रशासकिय मान्यता प्राप्त असुन बांधकामाची निविदा प्रसिध्द करण्यात आलेली आहे.  लवकरच एक सुसज्ज व सर्व सुख-सोयींसह 100 विद्यार्थी  क्षमता असणारे शासकिय  वैद्यकिय महाविद्यालयाची देखणी इमारत व 500 खाटांचे अद्यावत रुग्णालय इमारत बांधकाम करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग व कोल्हापुर या जिल्हयांना जोडणारे सोनवडे घाट रस्त्याच्या कामाकरिता सुमारे 7 कोटी 23 लाख इतका खर्च अपेक्षीत असुन सदर प्रकल्प आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे. जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसराचा  कायापालट होऊन प्रवाशांना व पर्यटकांना  जागतिक दर्जाची सेवा प्राप्त होणार आहे. या अंतर्गत कणकवली रेल्वे स्टेशनसाठी  5कोटी 85लाख, कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी  5 कोटी 90 लाख, सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशनसाठी 4 कोटी 90 लाख, तर सावंतवाडी रेल्वे स्टेशनसाठी  6 कोटी 20 लाख  मंजुर झालेले आहेत. ह्या कामाचे कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. ही कामे प्रगती पथावर असून लवकरच ती पूर्ण होतील. केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेमधुन श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसर  सुशोभिकरणासाठी सुमारे  2 कोटी 26 लाख रुपयांच्या कामांचा आराखडा केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे असेही ते म्हणाले.

गुणवंतांचा गौरव

प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.  

1)   कु. स्वरांगी संदिप खानोलकर हिने  सन 2023 मध्ये झालेल्या मुख्य गणतंत्र दिवस  शिबिरामध्ये सहभाग नोंदविलेला होता या जिल्ह्यातून माध्यमिक विभागातून राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने पहिल्यांदाच  हा  मान मिळवणारी एक विद्यार्थिनी म्हणून  सिंधुदुर्ग जिल्हयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिल्याने गुणगौरव 

2)  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटक निवास तारकर्ली येथे कार्यरत कंत्राटी कर्मचारी श्री. गणपत मनोहर मोंडकर व श्री वैभव  रामचंद्र सावंत  हे तारकर्ली समुद्रकिनारी पर्यटकांना पाण्यात बुडण्यापासून वाचवण्याचे काम करतात या उल्लेखनीय  कामगिरीसाठी  पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

3)  अपघातील गंभीर रुग्ण, प्रसुतीग्रस्त महिला, ह्दय रुग्ण, सर्पदंश, विषबाधा, श्वसन विकार, जळीत, अशा एकूण 1 लाख 33 हजार 13 रुग्णांना मोफत सेवा देण्याचे काम सिंधुदुर्ग  जिल्ह्यामध्ये  झाले आहे. याचे समन्वय साधण्याचे काम जिल्हा ईएमएस को- ऑर्डिनेटर नुतन महेश तळगांवकर यांनी आहोरात्र काम पाहत आहेत. या सोबत 108 रुग्णवाहिका जिल्हा व्यवस्थापक विनायक शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे पालकमंत्री यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.


4)  सन 2023-24 मध्ये जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे उल्लेखनिय कामगिरीबाबत  पालकमंत्री यांच्या हस्ते राजेद्र चंद्रकांत गोसावी, दत्तात्रय गणपतराव देसाई, दिपक भैरु शिंदे, राहूल भगवान तळसकर, शैलेश दिनकर कांबळे, धनाजी धोंडीबा धडे, रणजीत राहुल सावंत, कृष्णात लक्ष्मण पडवळ, अभिनंद अशोक कारेकर, सुजित कृष्णा सावंत यांना गौरविण्यात आले.

5)  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज उपक्रम -  जिल्हास्तरीय विजेत्याची नावे पुढीलप्रमाणे, वंशिता जितेंद्र पाटील, तेजस्वी जीवन कडू, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी, निकिता रामनारायण शर्मा, स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण. दिपेश रघुनाथ दळवी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैभववाडी, कार्तिक संभाजी मोरे, एस.एच. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कणकवली. प्राची सुनिल कदम  श्री. एस.एच केळकर कॉलेज ऑफ आर्टस, कॉर्मस, सायन्स देवगड, विद्या राजकुमार सावंत, श्री.पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, अमेय विजय आचरेकर, दत्तात्रय आनंद कदम, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी, चैतन्या जितेंद्र लाड, बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला.  विजेत्यांना प्रमाणपत्र व प्रतिकात्मकy धनादेशाचे वितरण पालकमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 10 नवउद्योजकांना प्रत्येकी रुपये 1 लाख बीजभांडवल तसेच 12 महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे.