
देवगड : विजयदुर्ग् येथील किल्लेप्रेमी राजीव परुळेकर यांच्या पुढाकाराने विजयसेतूचे बांधकाम पुर्णत्वास आलंय. यामुळे विजयदुर्गच्या पर्यटनामध्ये राजीव परुळेकर यांनी आणखीनभर टाकल्यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळत आहे.
विजयदुर्ग अष्टशताब्दी महोत्सवाचे प्रणेते व प्रेरणोत्सव समितीचे सल्लागार राजीव परुळेकर यांनी आपल्या घरासमोरील पाण्याच्या ओहोळावरती पुल बांधले असून या पुलाच्या बांधकामाला सिमेंटचा वापर न करता विजयदुर्ग किल्ला बांधकामासाठी त्यावेळी वापरण्यात आलेल्या साहित्याचा म्हणजेच काळा गूळ, मेथी पावडर, गुग्गुळ धूप, बेलफळ हे मिश्रण २४ तास उकळवून गुळाच्या काकवीसारखे तयार केले. यासोबत चुना, काथ्या आणि भाजीव विटांचा चुरा वापर करुन हे पुल बांधण्यात आले. मूळ पूल ४’x१०’ एवढया आकाराचे होते. नवीन पुलाचा आकार १४’x१०’. बांधण्यात आला. १२x८ मापाचे २३ चिरे आणि १ चावी(की स्टोन) याची एक कमान अशा १४ कमानी जुळवून त्याचा ओहोळावर बोगदा तयार केला. विजयसेतू असे नामकरण केलेल्या या पुलाचे उद्घाटन अक्षयतृतीयेच्या दिवशी रघुनाथराव रुद्राजी धुळप प्रभारी सरपंच रियाझ काझी, बॉनी नोरोन्हा, मंगेश वेतकर यांच्या शुभहस्ते तसेच माजी सरपंच प्रसाद देवधर, विठ्ठलवाडी मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय सावंत, ग्रामपंचायत सदस्य दिनेश जावकर,यांच्यासह अनेक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी परुळेकर परिवाराने सर्वांचे स्वागत केले.
विजयदुर्ग किल्याचा ऐतिहासिकपणा टिकविण्यासाठी विजयदुर्ग् येथील किल्लेप्रेमी राजीव परुळेकर यांचा नेहमीच पुढाकार असतो 2004-2005 साली विजयुदुर्ग किल्याला 800 वर्षे पुर्ण झाल्यामुळे अष्टशताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता. याचे पुढारपणा राजीव परुळेकर यांनी घेवून सदर महोत्सव यशस्वी पार पाडला होता. किल्याच्याच समोरील व धुळपवाडयाच्या पायथ्याशी राजीव परुळेकर यांचे घर असून या घरामध्ये प्रवेश करतेवेळी पाण्याचा ओहोळ आहे. यावरती शेकडो वर्षापुर्वीचे छोटे पुल होते. हे पुल जीर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी सिमेंटचा वापर नकरता किल्याचे बांधकाम ज्या पध्दतीने करण्यात आले त्याच प्रमाणे याच ठिकाणी राजीव परुळेकर यांनी पुल बांधण्याचा संकल्प केला होता. आणि हा संकल्प त्यांनी पुर्णत्वास देखील नेला आहे. गेल्या एक महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. चुना,गुळ,शिसम,दगडी चिरे व अन्य बाबींचा वापर करुन या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. किल्याप्रमाणेच या पुलाचे बांधकाम केल्यामुळे हे विजयसेतू पुल पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. विजयदुर्ग किल्यामध्ये आलेले प्रत्येक पर्यटक हे या विजयसेतू पुलाला भेट देत आहेत. यामुळे विजयदुर्गच्या पर्यटनामध्ये राजीव परुळेकर यांनी आणखीन एक भर टाकल्यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळत आहे.
पूर्वीच्या ऐतिहासिक पुलाचे जतन करीत तश्याच पद्धतीने नवीन पुलाचे काम करताना कोल्हापूरचे तरुण आर्किटेक्ट वर्धन वडगावे, इंजिनिअर अक्षय हिंगे यांनी मोठे योगदान दिले. तर पुलाच्या उभारणीसाठी हुबळी येथील कारागीर सोमनाथ त्याचप्रमाणे देवगड तालुक्यातील काटा कोलवाडी येथील बबन पुजारे, सुहास पुजारे आणि त्यांचे सहकारी यांनी काम पाहिले. या पुलाचे ऐतिहासिक पद्धतीने काम केले असल्याने अनेकजण तो पाहण्यासाठी येत आहेत.