
सावंतवाडी : आदर्श निवृत्त मुख्याध्यापक म्हणून माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांचा राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धा व किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
हा सोहळा शनिवारी २५ जानेवरी काझी शहाबुद्धिन हॉल येथे संपन्न झाला. यावेळी माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थानचे राजे युवराज लखमराजे भोसले,युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, माजी पं स सदस्य संदीप गावडे, चॅनेलचे संपादक सीताराम गावडे, युवा नेते दिनेश गावडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यामध्ये युवा उद्योजक म्हणून युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले,श्रेयस मुंज,ऐश्वर्या शेट कोरगावकर, शरद पेडणेकर, संतोष कानसे, दिनेश गावडे, अक्षय काकतकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर, जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, आदर्श निवृत्त मुख्याध्यापक प्रा. व्ही. बी. नाईक, उत्कृष्ट मालवणी कवी दादा मडकईकर, उत्कृष्ट हार्मोनियम वादक मयूर गवळी, समाजाभिमुख युवा पत्रकार विनायक गांवस या सर्व सत्कारमूर्तीना पुरस्कार वितरण करण्यात आले. यानंतर गणेश सजावट स्पर्धेतील विजेते स्पर्धक तसेच किल्ले स्पर्धेचे विजेते स्पर्धक यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या पुरस्कार वितरणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे असे गौरवउद्गार मान्यवरांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल पित्रे यांनी मानले.