रिंगरोडची हवा कुणी सोडली ? : शिवराम दळवी

बांदा-संकेश्वर न.प. अखत्यारीत नाही ; दोन वर्षांनी सीओंच उत्तर
Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2023 16:12 PM
views 195  views

सावंतवाडी : शहरातील बहुचर्चित रिंगरोडबाबत नगरपरिषदेचा ठराव झाल्याबाबत दिसून येत नाही असे नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी माजी आमदार शिवराम दळवी यांना तब्बल दोन वर्षांनी कळविले आहे. त्यामुळे बांदा-संकेश्वर महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार आहे किंवा कसे ? हे उघड होत नसल्याने दळवी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. संकेश्वर - बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार आहे. तो शहरातील रिंगरोडमधून जाईल असे सांगितले जात होते. मात्र रिंगरोड प्रस्तावित असल्याबद्दल नगरपरिषदेत ठरावच झाला नसल्याचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सावंतवाडी शहरावर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे जागरूक नागरिक म्हणून सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे असे दळवी यांनी म्हटले आहे.


सावंतवाडी नगरपरिषदेने रिंगरोड बाबत ठराव केला आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत माजी आमदार शिवराम दळवी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना एक पत्र दिलं होतं. या पत्राला मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी तब्बल दोन वर्षांनी प्रतिसाद देऊन नगरपरिषदेने रिंगरोड बाबत ठराव झाल्याबाबत दिसून येत नसल्याचे म्हटले आहे.


 सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना माजी आमदार शिवराम दळवी यांनी ७ जुलै २०२१ रोजी सावंतवाडी रिंग रोडबाबत एक पत्र दिलं होतं. त्यात ते म्हणतात, सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती बापूसाहेब महाराजांच्या सरकारला महात्मा गांधीजींनी रामराज्य असे संबोधले होते, हे आपणास माहिती आहे. या शहरांमध्ये संस्थानची नगरपरिषद होती. त्यावेळी निर्माण केलेली शहराची पायाभूत सुविधा अजूनही अस्तित्वात आहे. मात्र आता वाढलेली लोकसंख्या, वाहतूक यामुळे शहरातील रिंग रोडचा प्रस्ताव आला आहे असे आम्ही लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून ऐकत आहोत. संकेश्वर आंबोली माडखोल सावंतवाडी इन्सुली बांदा रा. क्र. ५४८ हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार असल्याचे केंद्रीय राजपत्रातून उघड झाला आहे. दरम्यानच्या काळात हा प्रस्तावित महामार्ग सावंतवाडीवरून जावा असा प्रस्ताव आहे. सावंतवाडी रिंग रोड प्रस्तावित आहे का ? रिंग रोड बाबत सावंतवाडी नगरपरिषद ठराव झाला आहे का ?असल्यास त्याचा मार्ग आणि किती जमीन संपादन करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात मार्गदर्शक होणारे रेखाचित्र काढले असल्यास ते मला मिळावे व नगरपरिषदेचे रिंग रोडबाबत धोरण नेमके काय आहे. याबाबत सविस्तर माहिती अवगत करावी असे निवेदन माजी आमदार शिवराम दळवी यांनी दिले होते.


 या निवेदनाला मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी उत्तर दिले नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा २८ सप्टेंबर २०२२ रोजी स्मरण पत्र काढले. त्यानंतर दुसरे स्मरणपत्र २७ मार्च २०२३ रोजी काढले आणि या स्मरणपत्रांच्या नंतर १२ एप्रिल रोजी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी २७ मार्च २३ च्या पत्रात आधीन राहून सावंतवाडी रिंग रोडबाबत माहिती दिली आहे. संकेश्वर आंबोली माडखोल सावंतवाडी इन्सुली बांदा क्रमांक ५४८ हा प्रस्तावित महामार्ग सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या अखत्यारीत येत नसल्याचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी म्हटले आहे. 

तसेच रिंग रोडबाबत सावंतवाडी नगरपरिषदचा ठराव पारित झाला आहे का? असल्यास मार्ग आणि किती जमीन संपादन करण्याचे नियोजन आहे ? या प्रश्नावर मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदच्या आस्थापना विभागाकडून माहिती घेतली असता तसेच या कार्यालयामध्ये उपलब्ध अभिलेखाची तपासणी केली असता रिंगरोड बाबत सावंतवाडी नगर परिषदेचा ठराव झाल्याबाबत दिसून येत नाही असे म्हटले आहे. तसेच रिंग रोडचे रेखाचित्र काढले असल्यास ते मिळावे व नगरपरिषदेचे रिंग रोड बाबत धोरण नेमके काय ? याबाबत सविस्तर माहिती मिळावी असे शिवराम दळवी यांनी म्हटले होते त्यावर मुख्याधिकारी यांनी संकेश्वर आंबोली माडखोल सावंतवाडी इन्सुली बांदा रिंग रोडच्या रेखाचित्राबाब सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या अखत्यारीत येत नसल्याचे म्हटले आहे.

 

दरम्यान आमदार माजी आमदार शिवराम दळवी म्हणाले, तब्बल दोन वर्षांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आपल्या पत्राला उत्तर दिले. या उत्तरात रिंगरोड बाबत नगरपरिषदेचा ठराव झाला नाही असे दिसून येत आहे असे त्यांनी म्हटले आहे. आता मुख्याधिकारी यांनी तब्बल दोन वर्षांनी दिलेल्या पत्राच्या उत्तरामुळे रिंग रोडची राजकीय चर्चा हवेत होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रिंगरोड बाबत नेमकी हवा कोणी सोडली तेही जनतेला समजले पाहिजे तसेच संकेश्वर-बांदा हा मार्ग सावंतवाडी शहरातून जाणार आहे किंवा नाही ? हे समजायला हवे अन्यथा मुंबई-गोवा महामार्गा सारखाच प्रकार होवून संकेश्वर आंबोली बांदा हा महामार्ग बावळट मार्गे बांदा जाईल अशी शक्यता वाटते आहे असे दळवी यांनी म्हटले आहे.