
सावंतवाडी : नेमळे देऊळवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि लोकप्रिय क्रिकेटपटू कृष्णा सहदेव नेमळेकर (वय ५८) यांचे शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
कृष्णा नेमळेकर हे गवताचा टेम्पो भरून झाल्यानंतर आपली मोटरसायकल सुरू करत असताना अचानक खाली कोसळले. प्रकृती अस्वस्थ वाटल्याने त्यांना तातडीने कोलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
कृष्णा नेमळेकर यांनी नेमळे ग्रामपंचायत निवडणुकीत पाच वर्षे सदस्य म्हणून काम केले. ते एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते होते. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते सातेरी देऊळवाडी संघाचे नेतृत्व करत होते आणि डावखुरे वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. कृष्णा नेमळेकर यांच्या आकस्मिक निधनाने नेमळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त होत आहे. नेमळे भाजपचे युवा सामाजिक कार्यकर्ते समीर नेमळेकर यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.