महागाईनं होरपळलेल्या जनतेच न.प.नं मोडलं कंबरडं !

....तर पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही : बबन साळगावकर
Edited by: विनायक गांवस
Published on: February 28, 2023 20:06 PM
views 283  views

सावंतवाडी : प्रशासकीय राजवट असणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेनं घरपट्टी व पाणीपट्टीत कुणालाही विचारात न घेता मोठी वाढ केल्यान धक्का बसला आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. २५ रूपयांपासून ३९९ रूपये घरपट्टी असणाऱ्यांना सरसकट ४०० रूपये आकारणी करण्यात येणार आहे. सर्वसामान्य गोरगरीबांना यांची झळ बसणार आहे. २५ रूपये असणाऱ्या ३७५ रूपयांचा भुर्दंड बसणार आहे. पाणीपट्टीतही ३ रूपये वाढ केली जाणार आहे. याविरोधात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण भारतात महागाईने जनता होरपळलेली असताना सावंतवाडी नगरपरिषदेन घरपट्टी व पाणीपट्टीत प्रचंड वाढ करत जनतेच कंबरडं मोडल आहे. सावंतवाडीची नळपाणी योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात फायद्यात चालणारी एकमेव योजना आहे. असंख्य लोक या पाण्याचा वापर करतात. सावंतवाडी न.प.च्या इतिहासात कधीही न झालेली करवाढ करत प्रशासनानं आपली जात दाखवून दिली आहे. या भुर्दंडामुळे शहरात पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही. ही करवाढ प्रशासनाला मागे घ्यावीच लागेल. माझा ८ वर्षांच्या कारकिर्दीतील सुविधा नागरिकांनी बघितल्या आहेत. मात्र, प्रशासन आल्यानंतर नेहमी अशीच परिस्थिती राहीली आहे. प्रचंड प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने निवडणूका घेणं गरजेचं आहे. दीड वर्ष निवडणूका न होणं हे शासनाच अपयश आहे. न.प. प्रशासनाच्या असुविधांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो याचा निषेध आपण करत आहोत. उघड्या डोळ्यांनी या गोष्टी पहाव्या लागत आहे याचा त्रास होतोय. मात्र, भविष्यात पुन्हा आमच्या ताब्यात नगरपरिषद दिली तर ही करवाढ पूर्णतः रद्द करू असं मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगांवकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, रवी जाधव आदी उपस्थित होते.