
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी अश्विनी पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. शहरातील अनेक विकास कामे ठप्प पडली असून या कामांना गती देण्यासाठी आपण लक्ष घालावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी केली.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग, माजी आरोग्य व क्रीडा माजी सभापती अँड. परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, नासिर शेख,आनंद नेवगी, मनोज नाईक, दिपाली भालेकर समृद्धी विर्नोडकर, भारतीय जनता पार्टीचे श्याम केनवडेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरातील नगरोत्थान मधील विकासकामे अद्यापही पूर्णत्वास आलेली नाहीत ही कामे तात्काळ सुरू करण्यात यावी अनेक कामे अपूर्ण असून काही कामे बंद आहेत याकडे लक्ष घालावे अशी मागणी यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे केली. त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून कचरा उचल करण्याकडे लक्ष घालून पाणीटंचाईवरही लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली
यावेळी सबनीसवाडा आणि उभा बाजार येथील पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती दूर करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी या शिष्टमंडळाला सांगितले तर नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेला सन्मानाची वागणूक मिळावी. अशी अपेक्षा माजी नगरसेवक आणि माजी नगरसेविकांकडून करण्यात आली. यावेळी आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शहराच्या विकासासाठी सर्वत्र निधी खर्च करण्याकडे लक्ष असणारा आहे नगरोत्थान बरोबर अन्य विकास निधी खर्च करून जास्तीत जास्त विकास कामे करण्याची ग्वाही मुख्याधिकारी पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिली.