
सावंतवाडी : भाजपचे माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी आपल्या सहकारी माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत लक्ष वेधले.
दरम्यान शहरात गेले दोन दिवस सफाई कर्मचारी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गेले दोन दिवस घरात कचरा असल्याने नागरिक हैराण होत आहेत. त्यामुळे त्वरित यावर तोडगा काढून कॉन्ट्रॅक्टरांशी बोलून ही समस्या मार्गी लावावी, नाहक लोकांना वेठीस धरू नका असेही माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना सांगितले. ही समस्या आपण येत्या दोन दिवसात मार्गी लावेन असे आश्वासने मुख्याधिकारी यांनी यावेळी दिले.
तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई देखील करून घ्यावी, लाड समितीची शिफारशीनुसार पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी देखील यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकांकडून करण्यात आली. यावेळी सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, राजू बेग आदी उपस्थित होते.