
सावंतवाडी : सावंतवाडी-रेडी राज्यमार्गावरील मळगाव घाटीत शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली असतानाही कोणीही मदतीला पुढे येत नव्हते. मात्र, याच वेळी देवदूतासारखे धावून आलेले माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांनी आपल्या गाडीतून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडवले.
निरवडे येथील रहिवासी महादेव निरवडेकर (वय ६०) हे आपली मुलगी ममता निरवडेकर (वय २५) हिच्यासह सावंतवाडी शहरातून आपल्या गावी दुचाकीने परतत होते. मळगाव घाटीत आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात महादेव निरवडेकर यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली.
अपघातग्रस्त आपल्या वडिलांना पाहून मुलगी ममता ही 'माझ्या बाबांना वाचवा, वाचवा' अशी केविलवाणी हाक मारत मदतीसाठी याचना करीत होती. मात्र, जमा झालेला जमाव केवळ 'बघ्या'ची भूमिका घेत होता.
याचवेळी सावंतवाडीचे माजी नगरसेवक तथा 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे संजय पेडणेकर हे आपल्या एका कौटुंबिक कार्यक्रमातून सावंतवाडीच्या दिशेने परतत होते. मळगाव घाटीतील गर्दी पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमी बाप-लेकीला आपल्याच खाजगी वाहनात घातले आणि तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे महादेव निरवडेकर यांचा जीव वाचला असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वडिलांचा जीव वाचल्याबद्दल ममता निरवडेकर यांनी संजय पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अश्रूपूर्ण नयनांनी आभार मानले. या मदतकार्यात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रूपा मुद्राळे, रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी मोलाचे सहकार्य केले.










