
दोडामार्ग : तिलारी धरणक्षेत्रा पलीकडील वनविभागाच्या राखीव क्षेत्रात पाहणीसाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर गांधील माशींनी हल्ला केल्याची घटना घडली. यात अनंत विठ्ठल देसाई, वय 65 रा उसप, गौरेश गजानन राणे, वय 35, रा पाल पुनर्वसन, सुशांत सुरेश कांबळे, वय 30 रा. साटेली भेडशी हे तिघे जण जखमी असून त्यातील एका कर्मचाऱ्यावर गोवा आझीलो येथे उपचार सुरू आहेत. तर एकला साटेली भेडशी तर तिसऱ्यावर दोडामार्ग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभागाने सांगितले.
याबाबत मिळालेली अन्य माहिती अशी की, तिलारी धरण क्षेत्रापलीकडे वनविभागाच्या अखत्यारीतील असलेल्या नैसर्गिक राखीव साधनसंपत्ती आहे. त्याच्या देखभालीसाठी वन विभागाचे कर्मचारी जात असतात. त्याच प्रमाणे शुक्रवारी देखील वनविभागाची १२ कर्मचाऱ्यांचे पथक तिलारी बुडीत क्षेत्राताच्या पलीकडे पाटये येथे हद्द पाहणीसाठी गेले होते. तिलारी धरणाच्या जलाशयातून बोटीच्या सहाय्याने ते पलीकडे गेले. त्यानंतर त्यांनी जंगलात प्रवेश केला. जंगलात भ्रमण करीत असताना अचानक गांधील माशांनी वनविभाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
गांधील माशांनी हल्ला करताच सर्वजण सैरभैर होऊन वाट मिळेल त्या दिशेने पळ काढला. मात्र, त्यातील तिघांवर गांधील माशांनी हल्ला चढविला. गांधील माशांच्या हल्यात घायाळ झालेल्या त्या तिघाही कर्मचाऱ्यांना पुनच्छ बोटीने धरणावर आणण्यात आले. त्यांना लागलीच सटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे तिघांवर उपचार करण्यात आले. मात्र, एक कर्मचारी जास्तच घालत अवस्थेत असल्याने त्याला गोवा आझिलो येथे पाठविण्यात आले. तर दुसऱ्याला दोडामार्ग येथे पाठविण्यात आले. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तिघांचीही तब्बेत ठीक असल्याचे सांगण्यात आले.