वृक्षतोडीस वनविभाग - जिल्हाधिकारी जबाबदार : स्टॅलिन डी

हत्तींना पकडण्याऐवजी जिओ टॅपिंगद्वारे लोकेशन शोधून ग्रामस्थांना सावध करा
Edited by: विनायक गांवस
Published on: April 12, 2025 18:40 PM
views 99  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः दोडामार्ग तालुक्यामध्ये परप्रांतीय आणि उद्योजकांकडून झालेली जमीन खरेदी तसेच बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्य प्राणी नागरी वस्तीत घुसू लागले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार वन अधिकारी आणि जिल्हाधिकारी असून ते आपली जबाबदारी झटकत आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास भविष्यात मानव आणि वन्य प्राणी यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळेल अशी भीती वनशक्ती फाउंडेशनचे स्टॅलिन डी यांनी व्यक्त केली. तर सरसकट वृक्षतोड बंदी असताना सुद्धा होणारी वृक्षतोड पाहता वनविभाग आणि जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई का होऊ नये यासाठी आम्ही नोटीस बजावणार असून वेळप्रसंगी हायकोर्टात धाव घेणार असल्याचेही श्री दयानंद म्हणाले.

स्टॅलिन दयानंद यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत डॉ.जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत नंदकुमार पवार चित्रा म्हस्के आधी उपस्थित होते. ते म्हणाले  दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेले हत्ती हे कर्नाटकातून आले नाहीत ते अन्य भागातूनही येऊ शकतात. दांडेली ते राधानगरी पर्यंत जाणारा त्यांचा मार्ग खुला केल्यास ते खाद्याच्या शोधात अन्य ठिकाणी जाऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून सद्यस्थितीत त्यांना पकडण्यापेक्षा जिओ टॅपिंग द्वारे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आणि ग्रामस्थांना जागृत करणे योग्य ठरू शकेल. मुळात आंबोली ते मांगेली हा त्यांचा भ्रमण मार्ग नसून दांडेलीती राधानगरीपर्यंत जाणारा मार्ग त्यांना पाहिजे हा मार्ग मुळात बंद असल्याने ते आज अन्नासाठी नागरी वस्तीकडे वळत आहेत याशिवाय जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने तसेच परप्रांतीयांकडून आणि उद्योजकांकडून झालेली जमीन खरेदी आणि तेथे होणारे डेव्हलपिंग पाहता वन्य प्राण्याचा अधिवासही धोक्यात आला आहे एकूणच या सर्वाचा परिणाम आज मनुष्य आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्षामध्ये पाहायला मिळत आहे. मुळात एक झाड तोडल्यास असलेला पन्नास हजार रुपयाचा दंड हा योग्यच होता मात्र एक हजाराचा दंड हा कोणीही भरू शकतो. आज दोडामार्ग सारख्या तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. खाजगी आणि फॉरेस्ट अशा दोन्ही ठिकाणी ही वृक्षतोड पाहायला मिळत आहे असे असताना वन विभाग आणि जिल्हाधिकारी नेमके काय करत आहेत हाच प्रश्न आहे.

न्यायालयाचे आदेश असून सुद्धा वन विभाग आणि जिल्हाधिकारी आपली जबाबदारी ओळखत नसल्याने आज वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्याला आपला बळी द्यावा लागत आहे. भविष्यात हत्तीच नव्हे तर बिबटे वाघ गवे हे भर वस्तीत येऊन मनुष्याचा जीव घेतील ही काळ्या दगडावरची रेख आहे. हत्ती हा प्राणी जवळपास एक हजार प्रवास करतो त्यामुळे ते कर्नाटकातून आले हे म्हणणे चुकीचे आहे दोडामार्गातील हत्तीचा कळप हा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर भागातच फिरत आहे, त्यांना पकडण्यापेक्षा जिओ टॅपिंग द्वारे किंवा अन्य अध्यावत यंत्रणेद्वारे त्यांच्या लोकेशन चा मार्ग शोधून ग्रामस्थांना सावध करणे किंवा त्यांना दुसरीकडे वळवणे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तशाप्रकारे वनविभागाने काम करावे.