सावंतवाडीच्या राजवाड्यात लोककला महोत्सव २०२५

सावंतवाडी राजघराणं - SPK चं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 21, 2025 18:55 PM
views 19  views

सावंतवाडी : सावंतवाडी राजघराणं व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोककला विभागातर्फे लोककला महोत्सव २०२५ च आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २६ जानेवारी दरम्यान हा महोत्सव सावंतवाडी राजवाडा येथे करण्यात आले आहे. विधी संख्येत, नारायण नमोस्तूते, राखणदार, देवी चंद्रलांबा परमेश्वरी, गिधाड घुबड संग्राम, विजयमणी, मुंबईची मुंबादेवी आदी दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार असून युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून 'भरतनाट्यम' आविष्कार होणार आहे‌. राज्याचे सांस्कृतिक मंत्री अँड. आशिष शेलार यांना या महोत्सवास आमंत्रित केले आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवराज लखमराजे भोंसले यांनी केले‌. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

२३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत सायंकाळी ६.३० ते ८ व रात्री ८.३० ते १० या वेळेत राजवाडा सावंतवाडी येथे हा लोककला महोत्सव सादर करण्यात येणार आहे. ७ दशावतारी नाटकांसह युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून 'भरतनाट्यम' आविष्कार होणार आहे. यात राजघराण्याच्या शूरवीर राजमातांचा गौरव या प्रयोगातून होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन युवराज लखमराजे भोंसले यांनी केले‌ आहे. याप्रसंगी अँड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, प्रा. दिलीप गोडकर, जयप्रकाश सावंत, डॉ. गणेश मर्गज आदी उपस्थित होते.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्यावतीने गुरुवार दि. २३ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ लोककला महोत्सवाचे आयोजन राजवाडा सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. या लोककला महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. सावंतवाडीचे युवराज लखमसावंत भोंसले यांच्या संकल्पनेतून येथील स्थानिक दशावतार कलाकारांना त्यांच्या कलेसाठी संधी उपलब्ध करुन देणे व लोकांसाठी दर्जेदार दशावतार नाटकांचे आयोजन करणे ही या मागची संकल्पना आहे. रोज सायंकाळी ६.३० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत दिड तासाची दोन दशावतार नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. यामध्ये दि. २३ जानेवारी २०२५ रोजी कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा विधी संख्येत' तसेच जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचा 'नारायणी नमोस्तुते' हा नाट्य प्रयोग होणार आहे. दि. २४ जानेवारी २०२५ रोजी नाईक मोचेमाडकर यांचा 'राखणदार' तसेच दत्तमाऊली दशावतार मंडळ यांचा 'देवी चंद्रलांबा परमेश्वरी' हा प्रयोग होणार आहे.दि. २५ जानेवारी २०२५ रोजी चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा 'गिधाड घुबड संग्राम' तर श्री सिद्धेश्वर पारंपारिक दशावतार मंडळाचा 'विजयमणी' हा नाट्यप्रयोग होणार आहे. संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून दि. २६ जानेवारी २०२५ रोजी भरत नाट्यम नृत्यांगना अॅकॅडेमी ऑफ फाईन आर्ट, मुंबई यांचा सावंतवाडी 'अष्टनायिका' हा भरतनाट्यम कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये सावंतवाडी राजघराण्याच्या राण्यांच्या भावनात्मक संघर्षाचा वेध घेतला जाणार आहे. राजघराण्यातील स्त्रियांना वारसा व परंपरा राखून प्रेम, कर्तव्य व सहनशक्तीच्या सीमा पार कराव्या लागल्या. त्यांचा जीवनसंघर्ष व पराक्रम या भरतनाट्यम प्रयोगातून सादर केला जाणार आहे. तसेच चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा मुंबईची 'मुंबादेवी' हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

भरतनाट्यम हा एक तासाचा नृत्याविष्कार असून सर्व दशावतार नाट्यप्रयोग दिड तासाचे असणार आहेत. समस्त कला प्रेमींनी आपल्या लोक कलाकारांच्या लोककलाविष्कारांचा तसेच भरतनाट्यम नृत्याविष्काराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवराज लखमसावंत भोंसले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारमल यांनी केले आहे.