विषारी अळंबी खाल्ल्यानं पाच जणांना विषबाधा

Edited by: विनायक गांवस
Published on: June 29, 2025 21:48 PM
views 906  views

सावंतवाडी : माणगाव येथील पवार कुटुंबानं विषारी अळंबी खाल्ल्यानं पाच जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष पवार (३६), शीला पवार (३०), सुप्रिया पवार (८), सावन पवार (१०) आणि चंद्रशेखर स्वामी (४०) अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

या सर्वांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पवार कुटुंबियांनी घराच्या बाजूला उगवलेली अळंबी खाल्ली  होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला. सुरुवातीला त्यांना माणगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या पार्श्वभूमीवर 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'ने नागरिकांना आळंबी खाताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या घटनेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम आणि सुजय सावंत यांनी कुटुंबियांना मदत केली. जंगलात किंवा घराच्या आसपास उगवलेली कोणतीही आळंबी खाण्यापूर्वी ती विषारी नाही याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, अशा गंभीर घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षता घ्यावी असे आवाहन सामाजिक बांधिलकीने केलं आहे.