वेंगुर्ला नगरपरिषद कोकण विभागात प्रथम

७५ लाखांच्या बक्षिसाला पात्र
Edited by: दिपेश परब
Published on: September 29, 2024 11:44 AM
views 249  views

वेंगुर्ला : स्वच्छतेसह पर्यावरण रक्षण यासारख्या सर्व क्षेत्रात वेंगुर्ला नगरपरिषेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०‘‘ अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या या गटात वेंगुर्ला नगरपरिषदेला कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून ७५ लाखांचे बक्षिस मिळणार आहे.

वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छतेमधून समृद्धीकडे आणि विकासाकडे जाण्याचा मार्ग दाखवून दिला आहे. गेली अडची वर्षे या नगरपरिषदेवर लोकप्रतिनिधी नसताना मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सर्वांना बरोबर घेऊन आपले काम योग्यरितीने पुढे नेले आहे. शहरातील घरोघरी निर्माण होणारा कचरा गोळा करून त्याचे २७ प्रकारात वर्गीकरण करून या कच-याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करून वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ‘शून्य कचरा‘ संकल्पना राबविण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हे पाहण्यासाठी आज देशभरातून अधिकारी, पर्यटक, नागरिक, विद्यार्थी येत असतात. शहरांमध्ये स्वच्छतेबरोबर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, स्वच्छता मोहिमा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे, विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल महत्त्व पटावे म्हणून स्वच्छतेवर आधारीत विविध वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्यामुळेच या स्पर्धेतही वेंगुर्ला नगरपरिषदेने आपली प्रथम क्रमांकाची बाजी कायम राखली आहे. या यशाबद्दल वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.