
देवगड : शाळेमध्ये प्रथमोपचार साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी तसेच तातडीच्या प्रसंगी त्वरीत मदत देण्यासाठी आणि मोठ्या संकटांना टाळण्यासाठी फारच उपयुक्त ठरतो. हे विद्यार्थी हित व शिक्षणभान लक्षात घेऊन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे कला शिक्षक मृत्युंजय मुणगेकर यांनी आज आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुमारे दोन हजार किमतीचे प्रथमोपचार साहित्य प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्याकडे सुपूर्द केले.
शाळा हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर आहे.शाळेमध्ये लहान मुले खेळताना व पळताना अभ्यास करताना कधीही किरकोळ अपघात किंवा अचानक तब्येत बिघडण्याच्या घटना घडू शकतात, अशावेळी प्राथमिक उपचार करता येऊ शकतात. ह्या बाबी लक्षात घेऊन कला शिक्षक मृत्युंजय मुणगेकर यांनी संवेदनशीलपणे प्रथमोपचार साहित्य प्रशालेस देणगी स्वरूपात दिले. त्यांनी दिलेल्या देणगीबद्दल ते कौतुकास पात्र आहेत.
त्यांच्या या देणगीबद्दल संस्थाध्यक्ष अॅड.अजितराव गोगटे, सचिव प्रवीण जोग, शाला समिती अध्यक्ष - प्रसाद मोंडकर व मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी मुणगेकर यांना धन्यवाद दिले आहेत.