वळिवंडेतील रस्त्याच्यालगतच्या आंबा - काजू बागांना आग

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 05, 2024 08:01 AM
views 118  views

देवगड : वळिवंडे येथील कलम बागांमध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात हापूस आंबा व काजू कलमे होरपळली आहेत. ही आग रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कलम बागांमध्ये पसरत आरे फाट्यानजीकच्या बागांमधून तोरसोळे गावाच्या सिमेपर्यंत गेली होती. वातावरणातील उष्मा व वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत स्थानिकांचे प्रयत्न सुरू होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी देवगड - जामसंडे नगरपंचायतीच्या अग्निशमक बंबाची मदतही घेण्यात आली होती. या आगीत बागायदारांचे सुमारे १५ लाखाहून अधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वळिवंडे येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कलम बागांमध्ये शनिवारी अचानक आग लागली. ही आग वाऱ्यामुळे पसरत गेली. वळिवंडे येथील प्रताप नारायण सावंत यांच्या बागेचे सुमारे एक लाख रुपये नुकसान, भालचंद्र पुंडलिक सावंत यांच्या बागेचे सुमारे एक लाखाचे नुकसान, प्रथमेश सदानंद कदम यांच्या बागेचे सुमारे एक लाखाचे नुकसान, संदीप बळीराम सावंत यांच्या कलम बागेला आग लागून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान, हेमंत बाळकृष्ण दळवी यांच्या बागेला आग लागून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याची नोंद देवगड तहसील कार्यालयातील महसूल विभागात करण्यात आली आहे. दरम्यान, ही आग तोरसोळे गावाच्या सिमेपर्यंतच्या बागांमध्ये पसरत गेली होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ४० ते ५० हेक्टर जमिनीवरील कलम बागांना या आगीची झळ पोहोचली असून सुमारे पाच हजाराहून अधिक आंबा व काजू कलमे होरपळी

आहेत. ही आग विझविण्यासाठी भाजपचे बुथ अध्यक्ष महेश सावंत, तंटामुक्तीचे अध्यक्ष मनोज सावंत, उपसरपंच नीलेश सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.