FIRE | कणकवलीत आग ; रेडिमेड कपडे व्यापाऱ्यांचे 10 लाखांचे नुकसान

नगरपंचायतीचा अग्निशामक आल्याने टळली मोठी हानी
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 28, 2023 08:23 AM
views 663  views

कणकवली : तेली आळी येथील अष्टविनायक गृहनिर्माण संस्था, पाताडे कॉम्प्लेक्सच्या एका फ्लॅटमध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत रेडिमेड कपडे व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग पहाटे 4.30 वाजण्याचा सुमारास लागली. घटनेची माहिती मिळतात स्थानिकांनी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांना माहिती दिली. नंतर त्यांनी लगेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना देत अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवून आग आटोक्यात आणली.


नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष घटनास्थळी होते. शेजारी राहणारे डॉक्टर आर्डेकर त्यांनी सर्वांना कळवले. यावेळी संजू शिरसाट, सतीश मसुरकर, यादव, विजय सावंत ,संजय गुरव ,हरकुळकर, दळवी देसाई, खोत आणि मंडी यांनी देखील आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.


तेली आळी येथे कस्टम ऑफिससमोर असलेल्या पाताडे कॉम्प्लेक्समध्ये एका फ्लॅट मध्ये आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास आगीमुळे धूर येऊ लागला. या फ्लॅटमध्ये आठवडा बाजाराला फिरून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी लहान मुलांचे कपडे व अन्य रेडीमेड कपड्यांचे मटेरियल स्टॉक करून ठेवले होते. आठवडा बाजाराला व्यवसाय करण्याकरता तीन ते चार जणांनी येथे एकत्रित हे मटेरियल स्टॉक केलेले होते. या आगीमुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, नगरपंचायतच्या आठ कर्मचाऱ्यांद्वारे अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. शहरातील अनेकांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. शॉर्ट सर्किटने आग लागली असण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.

प्रशासनाच्या वतीने कणकवली मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानीची पाहणी केली. साहित्य जळून खाक झाल्याने दहा लाखाचे व रूम बिल्डींगचे  5 लाख नुकसान असे मिळून एकूण 15 लाखाचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत मंडळाधिकारी मंगेश यादव हे देखील उपस्थित होते