नवोदय विद्यालयाच्या गोडाऊनला आग

Edited by: विनायक गांवस
Published on: March 05, 2025 19:18 PM
views 270  views

सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली नवोदय विद्यालयाच्या गोडाऊनला आग लागल्याचा प्रकार आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये गोडाऊन चार रुममधील जुन्या गाद्या तसेच अन्य सामान जळून खाक झाले. आग लागताच घटनास्थळी नगरपालिकेचा अग्निशमन बंब प्राचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये गोडाऊनच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

केंद्र शासनाच्या अख्यारीत येणारे नवोदय विद्यालय सावंतवाडी सांगेली येथे आहे. या विद्यालयाच्या परिसरातील साफसफाई आज कर्मचाऱ्यांमार्फत सुरू होती. परिसरात वाढलेली झाडी तसेच सुके गवत बाजूला करण्याचे काम सुरू होते. यावेळी परिसरात लावलेल्या आगीची ठिणगी वाऱ्यामुळे गोडाऊनमध्ये पडली. सोसाट्याचा वारा असल्याने गोडाउनमधील गाद्यांनी लगेच पेट घेतला. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा शर्तीचा प्रयत्न केला. परंतु, प्रयत्न अपुरे पडल्याने शेवटी सावंतवाडी नगरपालिकेचा बंब प्राचारण करण्यात आला. अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमध्ये नवोदयच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या घटनेची माहिती विद्यालयाकडून तहसीलदार श्रीधर पाटील यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी मंडल अधिकारी यांना पाठवले. ही इमारत नवोदय विद्यालयाच्या मुख्य इमारतीपासून काहीशी बाजूला असल्याने मोठा अनर्थ टळला.