
देवगड : देवगड तालुक्यातील नाद -सडा येथील लक्ष्मण कोकरे आणि शिरगाव- साळशी येथील बाबल्या पवार हे दोघेही गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते.या दोघांनाही वन विभागाकडून शासन नियमाप्रमाणे प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली आहे. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन ही कार्यवाही केल्यामुळे त्यांना ही आर्थिक मदत मिळाली आहे.
नाद-सडा येथील लक्ष्मण कोकरे आणि शिरगाव- साळशी येथील बाबल्या पवार यांच्यावर गवारेड्याने मार्च महिन्यात हल्ला केला होता.यावेळी वन विभागामार्फत तातडीने दोन्ही ठिकाणच्या घटनास्थळीचे पंचनामा केले होते.
बाबल्या पवार हे रात्री दुचाकीने घरी जात असताना शिरगाव- चौकेवाडी फाट्यानजीक त्यांच्यावर गवारेड्याने अचानक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते.यांच्यावर शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर कणकवली येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचार करण्यात आले. तसेच लक्ष्मण कोकरे यांच्यावर कुडाळमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.या नंतर या दोघांनाही सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करून प्रमाणपत्राची कार्यवाही करून त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी वन विभागाकडून तत्काळ प्रयत्न सुरू केले. व त्यांना प्रत्येकी पाच लाखाची आर्थिक मदत देण्यात आली.
यासाठी सावंतवाडी उप वन संरक्षक नवकिशोर रेड्डी, सहायक वन संरक्षक लाड, वनक्षेत्रपाल कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक निलेश साठे, घुगे, वनक्षेत्रपाल कुंभार, देवगड वनपाल सारिक फकीर या सर्वांनी जखमींना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.
जनजागृतीचे फलक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे गवारेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकरी नागरिक यांनी जागरूकता बाळगावी.या ठिकाणी ठिकठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात आले असून नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन वनविभाग मार्फत करण्यात आले आहे.