सविता आश्रमाला बांधकाम साहित्यासाठी माजी नगराध्यक्षांकडून १६ हजारांची आर्थिक मदत...!

संदीप परब यांच्या कार्याचे कणकवलीकरांकडून कौतुक
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 03, 2023 15:14 PM
views 124  views

कणकवली : गेले काही दिवस कणकवली पटकी देवी मंदिराजवळ असलेल्या पिकप शेडमध्ये विमनस्क स्थितीत असलेल्या एका व्यक्ती बाबत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे तेथील पटकी देवी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे यांनी लक्ष वेधले. त्यानंतर नलावडे यांनी तात्काळ त्याची दखल घेत सविता आश्रमाचे संदीप परब यांच्याशी संपर्क साधला.

संदीप परब यांनी देखील वेळ न दवडता आपल्या गाडीसह कणकवलीत धाव घेतली. व त्या व्यक्तीला सविता आश्रमात आसरा दिला. मूळ गणपतीपुळे येथील प्रकाश शिंदे असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. गेले काही दिवस ते या पिकप शेड मध्ये आसरा घेऊन थांबले होते. अन्न पाण्याविना त्यांचे हाल होत होते. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे हे सोमवारी सायंकाळी पटकीदेवी मंदिराजवळ गेले असता तेथील मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब  नलावडे यांच्या निदर्शनास आणली.

नलावडे यांनी यांची अवस्था पाहून सविता आश्रमाशी संपर्क साधला. संदीप परब यांनी कणकवलीत आल्यावर त्या व्यक्तीची अवस्था पाहिल्यानंतर त्याला प्राथमिक सोपस्कार पूर्ण करून पोलीस स्टेशनमध्ये नोंद करत सविता आश्रमात दाखल करून घेण्याचे मान्य केले. तसेच यावेळी संविता आश्रमाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या अनुषंगाने 40 गोणी सिमेंट ची आवश्यकता असल्याची बाब परब यांनी माजी नगराध्यक्ष नलावडे यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर नलावडे यांनी 40 गोणी सिमेंट करिता लागणारी 16 हजाराची रक्कम तात्काळ  परब यांना सुपूर्द केली. श्री. नलावडे यांनी दाखविलेल्या या दातृत्व बद्दल परब यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तसेच संदीप परब यांनी तात्काळ धाव घेऊन या निराधार व्यक्तीला आसरा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, माजी नगरसेवक अण्णा कोदे, दीपक डगरे, मंगेश उबाळे, किशोर घुरसाळे, किरण हुमरसकर आणि पटकी देवी मंदिर नजीकचे रहिवासी उपस्थित होते.