वैभव नाईकांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा

'संविधानिक हितकारिणी'ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 09, 2025 13:12 PM
views 1917  views

कणकवली : साळगाव (ता. कुडाळ) येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. साळुंखे यांच्यावर जातीय शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी संविधानिक हितकारिणी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, या घटना अत्यंत गंभीर असून सार्वजनिक पदावर कार्य केलेल्या व्यक्तीकडून अशी जातीय वागणूक होणे हा समाजासाठी धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे कायद्याच्या अधीन राहून तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्याला न्याय मिळवून द्यावा. अलीकडच्या काळात काही राजकीय प्रतिनिधींकडून ऍट्रॉसिटी कायद्याच्या दुरुपयोगाचा मुद्दा पुढे करून मागासवर्गीय समाजाविरुद्ध नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे. यामुळे समाजात जातीय तणाव वाढण्याची शक्यता असून अशा प्रकारची विधाने आणि हालचालींना आळा घालणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संविधानिक हितकारिणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, महासचिव गौतम खुडकर, निमंत्रक विनोद कदम, किरण जाधव, उपाध्यक्ष सुशील कदम आदी उपस्थित होते.