
कुडाळ : उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जिल्हा ठाकरे शिवसेनेच्या वतीने पुन्हा महामार्ग अडवून आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनेच्या वतीने पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, मुंबई-गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे चुकीच्या पद्धतीने मिडलकट ठेवण्यात आला आहे. या मिडलकटमुळे आतापर्यंत सात ते आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला, हा मिडलकट बंद करून त्याठिकाणी सर्कल किंवा उड्डाण पूल उभारावे, अशी मागणी झाराप पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्याकडे वारंवार करण्यात आली. निवेदनेही दिली. परंतु मुकेश साळुंके यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या मिडल कटमुळे मंगळवारी पुन्हा या ठिकाणी अपघात होऊन शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. तेव्हा ग्रामस्थांनी महामार्ग अडवून धरला होता. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक देखील याठिकाणी उपस्थित होते.
यावेळी वैभव नाईक यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारला, याआधीही वैभव नाईक यांनी महामार्गावरील खड्डयांप्रश्नी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यामुळे वैभव नाईक यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर मुकेश साळुंके यांनी अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुकेश साळुंके यांच्या जातीचा अपमान होईल असे कोणतेही वक्तव्य वैभव नाईक यांनी केलेले नाही. आम्ही त्याठिकाणी उपस्थित होतो. जर जाब विचारला म्हणून वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जात असेल तर झाराप येथे चुकीचा मिडलकट ठेवून शाळकरी विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा महामार्ग अडवून जनआंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा यावेळी देण्यात आला. पोलिस निरीक्षक श्री.मगदूम यांनी याबाबतचा तपास डीवायएसपी यांच्याकडे असून, या निवेदनाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख योगेश धुरी, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, अतुल बंगे, बाळू पालव, संतोष शिरसाट, युवासेनाचे संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, अॅड.सुधीर राऊळ, गुरू गडकर, अमित राणे, नितीन सावंत आदींसह शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते.










