
वैभववाडी : शहरातील संभाजी चौकात ठाकरे गटाच्या "होऊ दे चर्चा"कार्यक्रम उधळून लावण्यासाठी आलेल्या भाजपच्या त्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेने पोलीसांकडे केली आहे.याबाबतच निवेदन उबाठा शिवसेनेने वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही शिवसेना पक्षाच्यावतीने रितसरी परवानगी घेऊन येथील संभाजी चौकात होऊ दे चर्चा हा कार्यक्रम आयोजित केला होता. लोकशाही मार्गाने देशातील महागाई, बेरोजगारी यासह विविध या विषयावर चर्चा सुरू होती.
याप्रसंगी भाजपचे भालचंद्र साठे, संजय सावंत, बंड्या मांजरेकर, नेहा माईणकर, प्रकाश पाटील, प्राची तावडे, अवधूत नारकर, रमेश शेळके, दत्ताराम सावंत, अनंत नेवरेकर हे आमच्या कार्यक्रम स्थळी चाल करून येत होते. त्यांना हा कार्यक्रम उधळून लावून दहशत निर्माण करायची होती. मात्र, पोलीसांनी हस्तक्षेप करून पुढील प्रकार वेळीच थांबविला. समाजातील शांतता बिघडण्याच काम या मंडळींकडून केलं जातं होतं. या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.