
सावंतवाडी : जेसीबीची धडक बसून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चालक मोहन राठोड याच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात पुरेशी काळजी न घेता वाहन चालवणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात रविवारी गंभीर जखमी असणारा मनिष देसाई याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या सावंतवाडीकरांनी काम करताना दक्षता न घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
महाविद्यालयात बारावीचा निकाल आणण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या मनीष महादेव देसाई (वय १९) याला उपजिल्हा रुग्णालय रस्त्यासमोर जेसीबीची धडक बसून अपघात झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संरक्षक भिंतीच काम सुरू असताना हा प्रकार घडला होता. योग्य दक्षता न घेतल्यानं हा अपघात घडला. या अपघातात जेसीबीचा फाळका तरुणाच्या मानेला लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्यास गोवा-बांबोळी मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी दिली.
या अपघातप्रकरणी मनीषचे काका मिलिंद देसाई यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून जेसीबी चालक मोहन राठोड (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातच रविवारी मनिषचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सावंतवाडीकर संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र पडसाद उमटतील असा इशारा त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.