जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा | भाजपा महिला मोर्चाची मागणी

Edited by: विनायक गावस
Published on: June 11, 2023 11:03 AM
views 87  views

सावंतवाडी : भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सावंतवाडी महिला भाजपच्या माध्यमातून पोलिसांकडे करण्यात आली. भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी याबाबतचे निवेदन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना दिले.

भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनीधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करतायत‌. जिथे जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आम्ही आवाज उठवतो. पण सध्या भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हान करत आहेत. आव्हाड यांनी ९ जून रोजी रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटवर अपलोड केला आहे. चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा त्यांना बदनाम करण्याचा त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. हे सहन केले जाणार नाही. महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्विटरवरून बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटरवर टाकल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी मोहीनी मडगावकर यांनी केली आहे.यावेळी मेघना साळगावकर मिसबा शेख, साक्षी गवस, मेघा भोगटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.