
सिंधुदुर्गनगरी : निवडणूक प्रक्रीयेदरम्यान क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांची भूमिका महत्वाची असते. निवडणुकीच्या कालावधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाचे नियोजन करुन ते काम वेळेत पूर्ण करणे करावे, केलेल्या कामांचा नियमित अहवाल देणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रीयेदरम्यान क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी दिले.
नियोजन सभागृहात क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी श्रीमती देसाई तसेच तहसिलदार आणि क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांनी आपआपसात समन्वयाने काम करावे, प्रत्यक्ष मतदान केंद्राला भेट देऊन सर्व पाहणी करावी, देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची पडताळणी करावी, निवडणूक प्रक्रियेदरम्यान करावयाच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे, प्रत्येक काम वेळेत आणि चोख पणे पार पाडावे असेही ते म्हणाले.
श्री अग्रवाल यांनी उपस्थितांना कायदा व सुव्यवस्था कशा प्रकारे राखावी याबाबत मार्गदर्शन केले. मतदानाच्या पूर्वी, मतदानाच्या दिवशी आणि मतदान झाल्यावर क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी काय असते आणि ती कशा प्रकारे पार पाडायची याबाबत सखोल मार्गदर्शन केले. रावले यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचा अभ्यास करावा, त्या सूचनांचे तंतोतंत पालन कशा प्रकारे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली.
शेवाळे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्राथमिक कर्तव्ये, मतदान पूर्व जबाबदारी व कर्तव्ये, Vulnerabillty Mapping म्हणजे काय, निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात कशा प्रकारे घ्याव्यात, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी VM बाबत DEO यांना द्यावयाची माहिती, मतदान केंद्रनिहाय Vulnerabillty ठरविण्यासाठी नमुना, मतदान दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी करावयाची कामे, मतदानाच्या दिवशी करावयाची कामे आदी विषयांची माहिती प्रशिक्षणादरम्यान सविस्तर रित्या देण्यात आली.