
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरात दिनांक ८ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. नवसाला पावणाऱ्या या जागृत देवस्थानात नतमस्तक होण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच अलोट गर्दी केली होती.
सध्या मंदिराचा जिर्णोद्धार आणि नवीन वास्तू उभारणीचे काम विद्युत गतीने सुरु आहे. मंदिराच्या या नवीन रूपाचे काम प्रगतिपथावर असतानाही, जत्रोत्सवात कुठलाही व्यत्यय येऊ नये याची पूर्ण दक्षता घेण्यात आली होती. बांधकाम सुरु असूनही देवस्थान कमिटीने केलेले नियोजन अत्यंत वाखाणण्याजोगे होते. भाविकांना सुलभतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने देवाचे दर्शन घेता यावे, यासाठी कमिटीने विशेष मेहनत घेतली होती, ज्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.
महिला वर्गाची ओटी भरण्यासाठी व गाऱ्हाणे घालण्यासाठी मोठी लगबग दिसून आली. उत्सवानिमित्त मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. रोषणाईने उजळून निघालेल्या मंदिर परिसराचे दृश्य पाहण्यासाठी व दशावतार नाटकाचा आनंद लुटण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविक उपस्थित होते. ओरोस पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भक्तगण मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते.










