
दोडामार्ग : माटणे येथे पत्रकारांना वृत्तांकन करण्याऱ्यासाठी गेलेल्या पत्रकारना धमाकावणाऱ्या बाप-लेकाच्या अरेरावीला अखेर महसूलने चांगलाच दणका दिला आहे. तब्बल ८१ ब्रास माती साठा जप्त केल्यानंतर ज्या ठिकाणी हा मातिसाठा करण्यात आला होता त्या जमीन मालक रामचंद्र विनायक तेली यांना तब्बल ३ लाखांच्या जवळपास दंड थोटावण्यात आलाय. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत तब्बल २ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा दंडाची ही रक्कम भरण्याची नोटीस प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी बजावली आहे. याबाबतची सविस्तर माहिती महसूल कडून प्रेस नोट द्वारे पत्रकारांना देण्यात आलीय.
महसूलने केलेल्या कारवाईत सदर दंडाची रक्कम भरणा न केल्यास फौजदारी कारवाई व दंड रकमेचा बोजा ७/१२ वर चढवण्यात येईल असेही नोटिसीत स्पष्टपणे नमूद केलेय. त्यामुळे पत्रकारांना धमाकावणाऱ्या बाप लेकाचे खरे कारनामें जनतेसमोर उघड झाले आहेत. तर त्या जप्त केलेल्या मातीचे काही नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आल्याचेही प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी सांगितले. दरम्यान या कारवाईने गौण खनिज तस्करांचे धाबे चांगले दणाणले असून बिनबोभाट अरेरावीला चपराक मिळाली आहे.
टणे येथील श्री देव पूर्वाचारी काट्याजवळ मुख्य रस्त्याला लागूनच मातीसाठा करण्यात आला आहे. हा मातीसाठी मार्गस्थ होणाऱ्या पत्रकारांना दिसला. त्यामुळे पत्रकारानी तिथे जात वृत्तकन करणेकरिता फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी विठ्ठल उर्फ सूर्या नाईक व त्याचा मुलगा नवनाथ नाईक या दोघांनीही पत्रकारांना फोटो काढण्यास मज्जाव करत अरेरावी केली. बघून घेण्याची धमकीही दिली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली होती. यानंतर या मातीसाठ्या बाबत पत्रकारांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिली. त्यांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना घटनास्थळी पाठवून मातीचे मोजमाप घेत पंचनामे केले होते.
त्यावेळी तब्बल ८१ ब्रास मातीसाठा आढळून आला. महसूल प्रशासनाने संबंधित जमीन मालक रामचंद्र विनायक तेली यांना केलेल्या मातीसाठ्या बाबत कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करण्याची नोटीस काढली. या नोटिसीला उत्तर देताना रामचंद्र तेली यांनी म्हटले आहे की , माती साठा करण्याबाबत नवनाथ विठ्ठल नाईक यांच्यासोबत तोंडी करार झालेला आहे. तसेच बांधकाम करण्यासाठी मातीसाठा करण्यात आल्याचे खुलाशात म्हटले आहे. इतकंच नव्हे तर ही माती मालवण हेदूळ येथून आणल्याचे पास या चौकशीत महसूल ला सादर केले आहेत. मात्र रामचंद्र तेली यांचा हा खुलासा महसूलने अमान्य करत हा साठा बेकायदा असल्याचे निष्पन्न झाल्याने दंडात्मक कारवाई करून फोजदारी बाबत ही नोटीस बजावणी केली आहे.
सातबारावर रकमेचा बोजा ठेवण्यात येईल
रामचंद्र तेली यांचा खुलासा महसुलने अमान्य करत 'त्या' माती साठ्यावर दंडात्मक कारवाई केली. महसूल विभागाने रामचंद्र तेली यांना नोटीस काढली असून त्यात म्हटले आहे, ही नोटीस प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा दंड भरणा करावा. या मुदतीत दंडाची रक्कम भरणा न झाल्यास आपल्या विरुद्ध फौजदारी कारवाई करून या रकमेचा बोजा सातबारावर चढविण्यात येईल असे नोटीसीत नमूद केले आहे.
रस्त्यालगतचा साठ्यावर संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच कारवाई का केली नाही अशी विचारणा करत त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावणी केली. या नोटिसीला उत्तर देताना तलाठी यांनी म्हटले आहे, तो मातीसाठी कदाचित त्याच दिवशी केला असावा. त्याआधी तेथे साठा निदर्शनास आला नसल्याचे नमूद करत यापूर्वी साठा करण्यात आला असता तर पोलीस पाटील यांनी निदर्शनास का आणून दिले नाही? असा प्रती सवाल या खुलाशात नमूद केला आहे.