बाप - लेकानं पकडला 11 फुटी अजगर

Edited by: विनायक गावस
Published on: June 19, 2023 16:35 PM
views 296  views

सावंतवाडी : रविवारी १८ जूनला जगभरात फादर्स डे साजरा झाला. अनेकांनी आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पऱंतु, वडीलांच्या सामाजिक बांधिलकीचा वसा जपत एका चिमुकल्यानं 'फादर्स डे' निमित्त अनोख उदाहरण समाजासमोर ठेवल आहे.

 सावंतवाडी माठेवाडा येथे गुरूप्रसाद चिटणीस यांच्या निवासस्थानात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तब्बल ११ फूटी अजगर  आढळून आला. ही घटना समजताच आजूबाजूच्या लोकांची झोप उडाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांनी सर्पमित्र नाविद हेरेकर यांना फोन करत माहिती दिली. त्यानंतर तात्काळ सर्पमित्र नाविद आणि त्यांचा सुपुत्र कबीर हेरेकर घटनास्थळी दाखल झाले. घरात शिरलेल्या तब्बल अकरा फुटी अजगराला त्यांनी पकडत नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. 

अजगराला पकडल्यान परिसरातील लोकांचा जीव भांड्यात पडला. याबद्दल नाविद व कबीर यांचे त्यांनी आभार मानले. या निमित्ताने प्राणीमित्र असणाऱ्या वडीलांकडून बालवयातच धडे घेणारा लेक पहायला मिळाला.