
दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेतील सर्वे नंबर २०० मध्ये एक मजली इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपासून त्या इमारतीचे असेसमेंट करून न दिल्याने नगरपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी शशिकांत विष्णू सावंत व स्नेहप्रभा शशिकांत सावंत या दोन वृद्ध दांपत्यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली. कायदेशीर कागदोपत्री बाबी अद्यापही अपूर्ण आहेत त्या पूर्ण करा, ६० दिवसांत असेसमेंट दिले जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले.
पिकुळे येथील वृद्ध दाम्पत्य शशिकांत व त्यांच्या पत्नी स्नेहप्रभा यांच्या नावे दोडामार्ग बाजारपेठेतील सर्वे नंबर २००, हिस्सा नं. १ मध्ये जमीन आहे. या जमिनीत त्यांनी एक मजली इमारतीचे बांधकाम केले. या इमारतीचे असेसमेंट करण्यासाठी नोव्हेंबर २०२२ पासून प्रयत्न सुरू आहे. नगरपंचायतीला अर्जदेखील केले. येथील प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडे देखील वारंवार अर्ज केले.
मात्र, अद्याप पर्यंत या इमारतीचे असेसमेंट करून दिले गेले नाही. शशिकांत सावंत यांचे वय ७३ वर्षे तर स्नेहप्रभा सावंत यांचे वय ६८ वर्षे असल्याने येथील नगरपंचायतीचे वारंवार उंबरठे झरवणे शक्य नसल्याने या दोन्ही वृद्धांनी नगरपंचायतीच्या या कारभाराविरोधात नगरपंचायतीसमोर सोमवारी आमरण उपोषणास सुरुवात केली. यावेळी त्यांना नगरपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच बांधकाम करताना ज्या अटी, शर्ती घालून दिल्या होत्या त्याचे पालन केले गेले नसल्याचे सांगित उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र इतकी वर्षे प्रशासनाने आपणांस का कल्पना दिली नाही? असा सवाल उपस्थित करत आपण उपोषण स्थगित करणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाची पंचाईत झाली. उपोषणकर्ते हे वृद्ध असल्याने तात्काळ वैद्यकिय अधिकारी डॉ. रेडकर व रुग्णवाहिका तेथे दाखल झाले.
नगराध्यक्ष चव्हाण यांची शिष्टाई
नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी वृद्ध दाम्पत्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ज्याप्रमाणे बांधकाम परमिशन दिली त्या नियमात बांधकाम झाले नाही. त्या परमिशन व्यतिरिक्त जादा बांधकाम झालेले आहे. त्या नवीन बांधकामची परमिशन घ्या. तसेच सध्या ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून त्यास ठराविक कालावधी लागतो. त्यामुळे नियमानुसार सर्व कागदपत्रांची ऑनलाईन पूर्तता केल्यास ६० दिवसांत असेसमेंट दिले जाईल. जर नाही दिले तर तुमच्यासोबत मी उपोषणास बसेन असे आश्वासन नगराध्यक्ष चव्हाण यांनी दिल्याने शशिकांत सावंत यांनी पत्नीसह केलेले उपोषण स्थगित केले.