
दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या शिरंगे बोडण बुडीत क्षेत्रातील घरे व झाडे यांचा मोबदला मिळावा या मागणीसाठी अंकुश गवस वैगरे यांनी गुरुवारी उपोषण केले होते. येत्या ८ मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून तोडगा काढण्यात येईल असे फोनद्वारे पालकमंत्री नितेश राणे यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायत शिरंगे येथे सुरु केलेले उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण व तालुका प्रमुख दीपक गवस यांनी दिली.
तिलारी पाटबंधारे प्रकल्पपाच्या बुडीत क्षेत्रात भूसंपादन केलेल्या वनझाडे व बांधकामे यांची 1996 प्रमाणे फेर मोजणी प्रस्ताव करून मोबदला मिळावा या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त अंकुश गवस, विश्वनाथ घाडी, बाळकृष्ण गवस यांनी ग्रामपंचायत शिरंगे बोडन येथे गुरुवारी ०१ मे रोजी उपोषण छेडले होते. या उपोषणाला दोडामार्ग भाजप तालुका प्रमुख दीपक गवस व नगरध्यक्ष चेतन चव्हाण यांनी भेट देऊन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांना संपर्क केला.
उपोषण कर्ते अंकुश गवस वैगरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक येत्या ०८ मे रोजी लावून तोडगा काढू असे फोनद्वारे आश्वासन दिल्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी भाजप तालुका प्रमुख दीपक गवस, नगरध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप युवा मोर्चा तालुकाप्रमुख पराषर सावंत, ग्रामस्थ लवू गवस, तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव आदी उपस्थित होते.