फॅशन डिझायनर अक्षता खांबाळेकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

पुणे येथील 'द रॉयल ग्रुप'ने दिला पुरस्कार
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 18, 2025 13:36 PM
views 64  views

कणकवली : कणकवली येथील अश्विनी फॅशन डिझायनिंगच्या संचालिका तथा प्रतिथयश फॅशन डिझायनर श्रीम. अक्षता आनंद खांबाळेकर यांना पुणे येथील 'द रॉयल ग्रुप'चा जीवन गौरव पुरस्कार २०२५ नुकताच प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते अक्षता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अक्षता या गेली ११ वर्षे फॅशन डिझायनिंग क्षेत्रात आहेत. नऊवारी ही त्यांची 'स्पेशालिटी' आहे. अक्षता यांनी साकारलेल्या नऊवारी साड्यांना अगदी परदेशातूनही मागणी असते. विशेष म्हणजे अक्षता गेली आठ वर्षे फॅशन डिझायनिंगचा क्लासही चालवत असून आतापर्यंत जवळपास एक हजार युवती, महिलांनी त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे. यातील कित्येकजणींनी पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरात स्वत:चे व्यवसायही सुरु केले आहेत. व्यवसायिकदृष्ट्या फॅशन डिझायनिंग कसे करावे, याबाबत अक्षता मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पुणे येथील द रॉयल ग्रुपने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत केले. 

येरवडा - पुणे येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करतेवेळी अभिनेत्री प्राप्ती रेडकर, रॉयल ग्रुपचे पदाधिकारी नितीन झगरे व अन्य उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल अक्षता यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.