देवगडात शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 29, 2023 11:08 AM
views 93  views

देवगड : कृषी विभाग महाराष्ट्र शासन, आत्मा आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने “आंबा पिकावरील फुलकीड एकात्मिक व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्प” आणि शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ.अजय मुंज प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. 

यावेळी कैलास ढेपे तालुका कृषी अधिकारी, देवगड, फणसे गावाचे सरपंच श्री फणसेकर, ग्रामपंचायत सदस्य व इतर आंबा बागायतदार शेतकरी आणि तालुका कृषी अधिकारी देवगड कार्यालयाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी “आंबा फुलकीड एकात्मिक व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्प” संदर्भात उपस्थित आंबा बागायतदार शेतकरी यांना माहिती दिली तसेच सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत फळमाशी नियंत्रणासाठी 75% अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या फेरोमोन सापळे व लुर्स योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

डॉ.अजय मुंज यांनी सादरीकरणाद्वारे आंबा मोहोर संरक्षण तसेच प्रामुख्याने फुलकिडींचे नियंत्रण यासोबत आंबा पिकावर येणाऱ्या तुडतुडे, मिजमाशी, फळमाशी, कोयीती भुंगा इत्यादी विविध किडींविषयी व त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनादरम्यान देवगड तालुक्यातील आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोहर फुटून फळधारणा सुरू झाली आहे. त्यावर फुलकिडींचा प्रादुर्भाव सुरू झाला असून त्यासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे पहिली फवारणी स्पिनोसॅड 45 एस.सी. 2.50 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून करावी व नंतर दहा दिवसांनी थायोमेथॉक्सोन 25 WG या कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात 3.00 ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी. असे केल्यास प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. 

आत्मा अंतर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद दरम्यान उपस्थित शेतकरी यांनी आपल्या अडचणी तसेच शंका विचारल्या व संवादातून उपस्थितांचे शंका समाधान केले. तसेच प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन आंबा कलमावर फुलकिडींची ओळख कशी करावी व त्याचे नियंत्रण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांना “आंबा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन” या विषयावरील प्रादेशिक फळ संशोधन ,वेंगुर्ला यांनी तयार केलेली पुस्तिका तसेच “आत्मा” कार्यालयामार्फत “आंबा मोहोर संरक्षण”या विषयाची घडीपत्रिकाचे वितरण करण्यात आले.