
दोडामार्ग : तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचा उजवा कालवा घोटगेवाडी, घोटगे - परमे, कुडासे, सासोली मार्गे गोव्याच्या दिशेने जातो, त्या कालव्याचा वारंवार बंद असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झालेला आहे. पाण्याअभावी इथली शेती करपली आहे. याच पार्श्वभूमीवर घोटगे, परमे, घोटगेवाडी आदी भागातील शेतकरी 1 मे रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
याभागातील बागायती शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उतरला असून तो आता त्याकडे व्यवसाय म्हणून पाहत आहे. शहराकडे जाणारा तरुण वर्ग गावातील शेतजमिनी आपल्या मेहनतीने फुलवत आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून कालव्यातून अनियमित पाणी पुरवठ्याला तोंड द्यावे लागत आहे. योग्य नियोजनाच्या अभावामुळे ही समस्या निर्माण झाली असून गेल्या दोन वर्षापासून घोटगेवाडी ते घोटगे दरम्यान केर नदीवरील पाईपलाईन वारंवार कोसळत आहे. ही पाईपलाईन तुटल्यामुळे घोटगे पासूनच्या पुढील सर्व गावांचा पाणीपुरवठा बंद होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच येथील कालवा वारंवार फुटत (कोसळत) असतो. त्यामुळे कालव्याचे मजबुतीकरण करणे, याबाबत आपण शासनस्तरावर प्रयत्न करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी व वारंवार निर्माण होणारी समस्या कायमस्वरूपी सोडवावी.
घोटगे गावची नळ योजनेची विहीर तिलारी नदीलगत असल्याकारणाने प्रकल्पाच्या अतिरिक्त पाण्यामुळे विहिरीकडे बांधण्यात आलेली संरक्षण भिंत वाहून गेली. गेल्या वीस वर्षापासून प्रकल्पाच्या अतिरिक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी ही वाहून गेल्या आहेत. याबाबत तिलारी प्रकल्पाला निवेदने देऊनही कोणतेही दखल घेतली नाही. त्यामुळे नळ योजनेची विहीरही वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ताबडतोब दखल घेऊन या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अन्यथा घोटगे ग्रामस्थांना पाण्या वाचून वंचित राहावे लागणार आहे .
घोटगे वरचीवाडी येथे तिलारी प्रकल्पाचा कालवा गेल्यामुळे या काव्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. लहान मुले वाहून जाण्याचा प्रकारही घडलेला आहे. ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे मुलांचे जीव वाचले आहेत. असे वारंवार होणारे जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी कालव्यावर 100 मीटर रॅलीग बसवण्याची गरज आहे. ही रॅलीन बसवण्यात यावी.
प्रकल्पाच्या काव्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत जाणारा रस्त्यावर प्रकल्पाचे अतिक्रमण झालेले आहे. येथील अतिक्रमण दूर करून कायमस्वरूपी रस्ता करण्याबाबत तिलारी प्रकल्पाला लेखी निवेदने दिले होती. तसेच या जमिनीत कालव्यावरून उतरण्यासाठी पायऱ्याही ठेवण्यात आलेल्या नाही. या पायऱ्या बांधण्यात याव्यात. या संदर्भातही त्यावेळी प्रकल्पाला लेखी निवेदने देऊनही कोणतेही दखल घेतली नाही. या विविध मागण्याची दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थ दिनांक 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालय घोटगे येथे ग्रामस्थासमवेत उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थ विनय भगवान दळवी तसेच घोटगे ग्रामपंचायत सरपंच भक्ती भरत दळवी, उपसरपंच विजय दळवी, ग्रामपंचायत सदस्य यांनी दिला आहे.
प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
1) कालव्यातील पाईप लाईन तसेच ठीक ठिकाणी कोसळत असलेल्या कालव्याचे मजबुतीकरण करणे.
2) नळ योजना विहिरीकडे संरक्षण भिंत बांधणे.
3) घोटगे वरचीवाडी येथे अपघात स्थळी कालव्याच्या बाजूला 100 मीटर रॅलींग बसवणे.
4) कालव्याच्या बाजूने शेत जमिनीत जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता करणे.
5) कालव्यावरून शेत जमिनीत उतरण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधणे.










