भाजप महिला मोर्चातर्फे आज कणकवलीत आक्रोश मोर्चा

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत होणार मोर्चा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 30, 2026 11:29 AM
views 63  views

कणकवली : केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणलेल्या 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा  जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने आज गुरुवार,३० एप्रिल रोजी कणकवली शहरात भव्य आक्रोश निषेध पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी करणार आहेत. ही आक्रोश पदयात्रा सायंकाळी ४ वाजता कणकवली - जानवली नदीजवळील मनोहर शिल्प मॉल येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत होणार आहे.

केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत महिलांना आरक्षणाचा हक्क देणारा नारीशक्ती वंदन कायदा मंजूर केला आहे. मात्र, या विधेयकाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवल्याने महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महिलांच्या हक्काचा आणि सन्मानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चा आता आक्रमक झाली असून, पदयात्रेच्या माध्यमातून हा रोष व्यक्त केला जाणार आहे.

पदयात्रेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधी आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नारीशक्तीचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी तसेच भाजप महिला मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि जिल्ह्यातील माता-भगिनींनी या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन काँग्रेसच्या निषेधार्थ आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन भाजप महिला मोर्चा, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.