आधारभूत भात खरेदी योजनेंंतर्गत शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी : मनीष दळवी

Edited by: देवयानी वरसकर
Published on: October 13, 2022 14:52 PM
views 244  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात एकूण आठ खरेदी विक्री संघमार्फत २८ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली असून आधारभूत भात खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात खरेदी केंद्रावर तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून दळवी यांनी केले आहे.                           

 सन २०२२-२३  करिता शासनाच्या आधारभूत भात खरेदी योजनेअंतर्गत खरेदी होणाऱ्या भातासाठी शासनाने प्रतिक्विंटल रुपये २०४०/- दर जाहीर केलेला आहे जिल्ह्यात एकूण आठ खरेदी विक्री संघामार्फत २८ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केलेली असून नोंदणीसाठी चालू वर्षातील ई पीक पाहणी झालेला ७/१२, आधार कार्ड, मतदानओळखपत्र बँक पासबुक व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सह शेतकऱ्यांनी स्वतः खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावयाची आहे.

नोंदणी न झाल्यास खरेदी केंद्रावर भात विक्री करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत. त्याकरिता ई पीक पाहणी झाली नसल्यास संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने ७/१२ उपलब्ध करून घ्यावा व भात खरेदी केंद्रावर२१/१०/२०२२ पूर्वी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.