
सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ले तालुक्यातील कोंडूरा येथील मच्छीमार शेतकऱ्यांच्या माड बागायती मध्ये कुळ कायद्याला धाब्यावर बसवून होणारे बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ थांबवून त्यांना न्याय न मिळाल्यास 1 मे 2025 रोजी तीव्र आंदोलन छेडून न्याय मागावा लागणार असा इशारा विविध शेतकरी संघटना आणि अनेक राजकीय पक्षाच्या लोकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी अनील पाटील यांना दिला आहे.
चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांवर होणारे अन्याय कदापि सहन करणार नाही असे सांगत जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या किनारपट्टीवर वसलेल्या वायंगणी गावातील कोंडूरा येथील मच्छीमार शेतकऱ्यांच्या माडबागायतीमध्ये अतिक्रमण करून नियमबाह्य व बेकायदेशीर रस्ता करण्याचा प्रयत्न गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रशासन करत आहे.
याबाबत अन्यायग्रस्त मच्छिमार शेतकऱ्यांनी प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधून घेतलेले असताना सुद्धा प्रशासनाकडून या नियमबाह्य कामाला पाठीशी घातले जात आहे. सदर मच्छीमार शेतकऱ्यांची कागदपत्रे पहाता शासनाने कुठल्याही कायदेशीर कागदपत्राच्या आधारे या मच्छीमार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्याचे दिसून येत नाही. प्रत्यक्षात जागेवर मुळ रस्त्याची दिशा बदलून माडबागायतीचे अतोनात नुकसान करुन येथील लोकांची दिशाभूल केली जात आहे.
जमीन संपादनाबाबत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पडलेली नसताना देखील प्रशासन संबंधित शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय करतानाच दिसत आहे.
वेंगुर्ले कोंडुरा येथील मच्छीमार शेतकऱ्यांच्या माडबागायतीत संबंधित बांधकाम विभागाने रस्त्याच्या नावाखाली बेकायदेशीर अतिक्रमण करून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केलेले आहे . ही बाब अतीक्षय गंभीर असून येथील मच्छीमार व शेतकरी हे कदापि सहन करणार नाही.
शासनाने आपल्या जमिनी ज्या कागदपत्रांच्या आधारे कायदेशीर बाबींची पूर्तता करून संपादित केलेल्या आहेत त्या कागदपत्रांची अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करून देखील कुठल्याही खात्याच्या अधिकाऱ्यांनी अद्याप पर्यंत अशी कोणतीही कागदपत्रे दिलेली नाहीत.
खानोली कोंडूरा ते येरम लिंगाचे देवालय या रस्त्यामध्ये झालेले अतिक्रमण हटविण्यात यावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे आदेश असल्याचे अन्यायग्रस्त मच्छीमार शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवून येथील शेतकऱ्यांच्या माडबागायतीचे कुंपण तोडून वेळोवेळी बांधकाम विभागांने नुकसान केलेले आहे.
मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशामध्ये अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या जमीन मिळकतीचा कुठलाही सर्वे नंबर नमूद केलेला दिसत नाही त्यामुळे बांधकाम विभागाकडून वेळोवेळी केले जाणारे कृत्य हे बेकायदेशीर व नियमबाह्य आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार अद्याप पर्यंत संपादित न झालेल्या जमीन मिळकतीत आल्यास पोलीस खात्याकडून देखील मच्छीमार शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे हा सारा प्रकार संपूर्ण वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातील मच्छीमार शेतकऱ्यांना यापुढे हानिकारक ठरणार आहे.
त्यामुळे यापुढे वेंगुर्ले तालुक्यातील कोंडूरा येथील मच्छीमार शेतकऱ्यांच्या माडबागायतीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून नुकसान करण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातील मच्छीमार शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून न्याय मागवा लागेल व यावेळी होणाऱ्या परिणामास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील त्यामुळे यापुढे माड बागायतीचे कुंपण तोडण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून त्यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व शासनाने अशा प्रकारे बेकायदेशीर कुणाच्याही जमीन मिळकतीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा निर्णय घेतला असल्यास तसे जाहीर करावे.
हा सारा प्रकार लक्षात घेता पूर्णता मच्छीमार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे तरी सदर बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ थांबविण्यात यावे अन्यथा 1 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडून न्याय मागावा लागेल. व होणाऱ्या परिणामास सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी स्थानिक शेतकऱ्यांसह शेतकरी नेते व फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय, शेतकरी नेते संजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते समीर कुडाळकर, योगेश तांडेल, प्रदीप सावंत, प्रवीण राजापूरकर, आदी उपस्थित होते