ऐन आंबा काढणीच्या हंगामात बागायतदार संकटात

अतिथंडी, वाढत्या तापमानामुळे मोठे नुकसान
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 17, 2023 20:14 PM
views 376  views

कृष्णा ढोलम, मालवण 

अति थंडी आणि वाढत्या तापमानामुळे  ऐन आंबा काढणीच्या हंगामात आंबा बागायतदार संकटात सापडले आहे. कडक उन्हामुळे आंबा फळ पूर्णतः भाजून गेलं आहे. काहींनी आंब्याला कागद लावून उन्हापासून सुरक्षा कवचही दिले आहे. पुढील काही दिवस हे वातावरण असेच राहिल्यास आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होणार आहे. 


आधी अवकाळी पाऊस त्यात सतत वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे आंबा बागायतदार हवालदील झाले आहेत. सुरुवातीला पडलेली थंडी ही आंबा पिकासाठी फायदेशीर ठरली होती. लक्षणीय फळधारणा होईल असे वातावरण होते.  मात्र, त्यानंतर  थंडीचे प्रमाण वाढत गेले आणि अति थंडीमुळे आंबे गळून पडण्यास सुरुवात झाली. मोठे झालेले फळ गळून पडल्याने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. त्यात वानरांचा उपद्रव वाढल्याने आहे ते फळ तरी टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांनी धडपड सुरु केली. अन् काही दिवसात तापमान वाढत गेले. या वाढत्या तापमानाचा फटका आंबा व्यवसायिकांना बसला. थंडीतून टिकवलेले फळ वाढत्या तापमानात भाजून गेले. फळ पूर्णतः करपून गेले आहे. ऐन आंबा काढणीच्या वेळी तपमानात वाढ झाल्याने आंबा बागायतदार हवालदील झाले आहेत. काहींनी फळ वाचविण्यासाठी आंबा फळावर कागद लावून सुरक्षा कवच देण्याची शक्कल लढवली आहे. मात्र, किती झाडांना आणि आंब्यांना असे सुरक्षा कवच देत राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 



बहुतेक बागायतदार हे कराराने आंबा बागा घेतात. लाखो रुपये मोजून बागा घेतलेल्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिक विमा काढला असला तरी त्याचा मूळ मालकाला फायदा होणार आहे. त्यामुळे कराराने घेतलेले बागायतदार अडचणीत आले आहेत. त्यात वाशी आणि कोल्हापूर येथील मार्केटमध्ये आंबा घेण्यास नकार देण्यात आला आहे. सध्याच्या वातावरणातील आंबा पाठवू नका, घेणार नसल्याचे मार्केटमधून बागायतदारांना सांगण्यात आले आहे. ज्या आंबा फळाला हानी पोहोचली नाही असं फळ सुद्धा घेण्यास मार्केट मधून नकार देण्यात आला आहे.

याबाबत आंबा बागायतदार महेश गांवकर म्हणाले, प्रचंड उन्हामुळे खूप मोठ्या प्रमाणात आंबा भाजलेला आहे. मेहनत करून तयार झालेल्या आंब्याचे नुकसान झाले आहे. आंब्याचे उत्पन्न कमी असले तरी फवारणीचा खर्च तेवढाच आहे. हे आम्हा बागायतदारांना परवडणारे नाही. त्यात मार्केटमध्ये आंबा घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे असे आंबा बागायतदार महेश गावकर यांनी सांगितले. 


तर, कृषी सल्लागार ऋषिकेश परब म्हणाले, ऑक्टोबर पासून लहरी हवामान, तापमामानात चढ उतार, आणि पिकासाठी पोषक वातावरण पहिल्यापासूनच तयार झाले नाही. त्यामुळे मोहर कमी आला. 15 ते 20 टक्केच मोहोर आला. आता कलम फुटतायत पण फळ पावसाळ्यात  तयार होणार. त्याचा शेतकऱ्यांना  काहीही उपयोग होणार नाही. होळीच्या दरम्यान तापमान वाढते. मात्र, आता अचानक तापमान वाढले. त्यामुळे होता तो सुद्धा आंबा खराब झाला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानी बाबत फळ पिक योजनेतून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असती. पण फळ पिक विमा योजना 15 मार्च नंतर सुरु होते. मात्र आता नुकसान झाले त्याचा काहीही भरपाई शेतकऱ्यांना विमा योजनेतून मिळणार नाही. लहरी हवामानामुळे मुळातच आंबा पिक कमी होतं. त्यामुळे सरकारने शेतकाऱ्यांना विशेष पॅकेज मधून भरीव नुकसानभरपाई द्यावी. किंवा आताचे नुकसान गृहीत धरून पिक विम्यातून भरपाई द्यावी. असे श्री. परब यांनी सांगितले.