पर्यावरणीय बदलामुळे शेतकरी शेती सोडून शहराकडे वळतोय

शेतकऱ्यांच्या हितासाठी काम : भारतीय किसान संघ
Edited by: विनायक गांवस
Published on: January 17, 2026 15:58 PM
views 20  views

सावंतवाडी : शेती व शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय किसान संघ नेतृत्व करत असून जैवविविधतेने नटलेल्या शेतीप्रधान सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदललेल्या पर्यावरणाने शेती आणि शेतकरी यांची स्थिती चिंतनीय झाली आहे. मनुष्यबळाची कमतरता, पावसाची अनियमितता, वन्य प्राण्यांचा वाढलेला उपद्रव यामुळे शेतकरी शेती सोडून शहराकडे चालला आहे. या परिस्थितीत भारतीय किसान संघ ही देशातील सर्वात मोठी शेतकरी संघटना रचनात्मक काम, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असल्याचे मत भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विशाल चंद्रकार यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


ते पुढे म्हणाले, आमची संघटना केवळ आंदोलन करणारी नसून शेतकऱ्यांच हित कसे होईल यासाठी शासनाला साथ देणारी आहे. शासनाच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच हीत साधणं आमचा उद्देश आहे. सेंद्रिय शेती हा प्रमुख उद्देश आमचा असून केमिकमल कंपन्यांना शासनाकडून दिलं जाणार अनुदान हे थेट शेतकऱ्यांना द्याव अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातल्या पिकांच्या गरजेनुसार शेती अवजारांचा विविध शासकीय योजनांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार तसेच नारळ, सुपारी बागायतीमधील शेती बागायतीस पाणी देण्यास सौर पंप अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे कृषी वीज जोडणी देण्यात यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री कार्यालय सचिवालय मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. 



दरम्यान, सिंधुदुर्गात भारतीय किसान संघाने केलेल्या कामाचा आढावा जिल्हा मंत्री अभय भिडे यांनी घेतला. शेतकऱ्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी रुपये 25000 शेतकऱ्याला देण्यात यावेत या देश स्तरावरील मागणीमुळे शेतकरी सन्माननिधी ही योजना शासनाने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. तर महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील म्हणाले, पर्जन्य मापन योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक गावात पर्जन्यमापक असावे ही मागणी आताच्या अधिवेशनात शासनाने मान्य केली. याचा उपयोग विमा वितरणामध्ये होणार आहे. तर  जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती नुसार आंबा, भात आणि इतर पिकांसाठी पीकविमा तसेच शेतकऱ्यांच्या हवामाना बाबत माहितीसाठी हवामान केंद्रांच्या उभारणीसाठी मागणी करण्यात आली व त्याचा पाठपुरावा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय किसान संघ हा शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी कायमच आग्रही राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य प्राणी, वीज जोडणी, सिंचन या मागण्यांसाठी आग्रही राहील वेळ पडल्यास मोर्चा, धरणे आंदोलन इत्यादी संघर्ष धोरणांचा मार्ग अवलंबण्यासाठी सदैव तयार असल्याचेही त्यांना स्पष्ट केले. यावेळी भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विशाल चंद्राकर व महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत, जिल्हा मंत्री अभय भिडे, धनंजय गोळम, मनोहर ठिकार आदी भारतीय किसान संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.