पाचव्या दिवशी गौरी-गणपतीला निरोप

Edited by: दिपेश परब
Published on: September 23, 2023 18:01 PM
views 86  views

वेंगुर्ले: तालुक्यात ठिकठिकाणी आज (२३ सप्टेंबर) घरोघरी प्रत्येकाच्या परंपरेनुसार गौरी पूजन करण्यात आले. काही ठिकाणी वस्तीच्या तर तर काही ठिकाणी एकदिवशीय गौरींचे पूजन उत्साहात करताना महिला वर्ग पाहायला मिळाल्या.

गणेश चतुर्थीप्रमाणे गौरी पूजनालाही तेवढेच महत्त्व आहे. प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे या देवींचा कार्यक्रम काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी एक दिवस चालतो. त्यानुसार प्रत्येकाच्या परंपरेनुसार शुक्रवारी (२२ सप्टेंबर) सकाळी व आज शनिवारी सकाळी देवींचे आगमन झाले. महिलांनी परंपरेनुसार पानवठ्याच्या ठिकाणावरून या देवींना घरी आणून विधीवत पूजन करण्यात आली. देवीसमोर वोवसा भरण्याचा कार्यक्रम महिलांनी उत्साहात पार पाडला. रात्रौ या देवींसमोर फुगड्या, भजन असे कार्यक्रमही संपन्न झाले. रात्री उशिरा या देवींचे विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी देवीची मूर्ती तर काही ठिकाणी पारंपारीक नैसर्गिक पद्धतीत या देवीचे पूजन करण्यात आले. सायंकाळी या देवीना नाचणीची भाकरी व शेगुलच्या भाजीचा नैवेद्य करून नंतर गाऱ्हाणे घालून देवींचे विसर्जन करण्यात आले. या नंतर सर्वांना नाचणीची भाकरी व शेगुलची भाजी प्रसाद म्हणून देण्यात आला.