पुढच्या वर्षी लवकर या...

दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप
Edited by: विनायक गावस
Published on: September 21, 2023 12:22 PM
views 104  views

सावंतवाडी : शहरात दीड दिवसांच्या गणरायाला बुधवारी मोठ्या भक्तीभावानं निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीच्या संगतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला मंगळवारी प्रारंभ झाला. पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून घरोघरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नातेवाईक, पाहुणे मंडळींनी एकमेकांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. महिलांच्या फुगड्याही विशेष लक्षवेधी ठरल्या‌.

बुधवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांस प्रारंभ झाला. विधिवत उत्तरपूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या. विसर्जनस्थळी मोती तलाव येथे नगरपरिषदेच्यावतीन खास आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांचा ही कडक बंदोबस्त होता. शहरात अनेक ठिकाणी पाच, सात, अकरा दिवस तर 21 दिवसांचा तीन मानाच्या गणपतींचा सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येतो.


मंत्री दीपक केसरकरांकडून विसर्जनस्थळी खास व्यवस्था !

शहरातील गणरायांचे विसर्जन ऐतिहासिक मोती तलावात केलं जातं. गणेशभक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जातीनीशी लक्ष घालून प्रशासनाकडून चोख व्यवस्था केली. यासह लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी या विसर्जनस्थळी शिवसेनेकडून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली. कोल्हापूर येथून विशेष मशीनरी यासाठी मागविण्यात आली होती‌. यामुळे तलावाच्या विसर्जन स्थळांना वेगळा लूक पहायला मिळाला. गणेश भक्तांनी या खास नियोजनासाठी मंत्री केसरकरांचे आभार मानत लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला.


ऐतिहासिक 'राज गणपतीं'ना भक्तीभावात निरोप !

ऐतिहासिक राजघराण्यातील दीड दिवसांच्या गणपतीच विसर्जन मोती तलाव येथे करण्यात आलं. राजेसाहेब खेमसावंत भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या उपस्थितीत राजघराण्याच्या मंगलमुर्तीची राजवाडा येथून वाजत गाजत मिरवणूक काढत निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे राजघराण्याचा हा गणपती शेंदूरी (लाल) रंगाचा असतो. तर दुसऱ्या गणपतीच पूजन ऐतिहासिक माठ्यात माठेवाडा येथे केलं जातं. दीड दिवसांच्या या दोन्ही गणपतींचं राजघराण्याकडून एकत्रित विसर्जन करण्यात आल.