१७ दिवसांच्या गणपतींना निरोप..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 06, 2023 17:04 PM
views 117  views

सावंतवाडी : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...! चा जयघोष करीत डीजेच्या दणदणाटासह फटाक्यांच्या आतिषबाजीत गुरुवारी सतरा दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. जुनाबाजार नरसोबाचा गणपती व सालईवाड्यातील भट्टीवाड्याच्या गणपतींच मोती तलाव येथे विसर्जन करण्यात आले. 

डिजेच्या दणदणाटात मिरवणूकीने गणेशमुर्ती विसर्जनासाठी आणण्यात आल्या. जुनाबाजार येथील श्री नरसोबाचा गणपती पालखीतून विसर्जनस्थळी आणण्यात आला. भाविकांकडून गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला. दरम्यान, सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्याने तालवाच्या पाण्यात कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे तराफ्यावर मुर्ती ठेवून आरती करण्यात आली. विसर्जनापर्यंत पाऊस न पडल्याने सर्वांना सोयीचे झाले होते. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन झाल्यानंतर गुरुवारी १७ व्या दिवशी सार्वजनिक गणपतींसह एका घरगुती गणरायाच विसर्जन झालं. यंदा डीजेचा दणदणाट अधिक पहायला मिळाला. डिजेच्या दणदणाटात तरूणांई बेधुंद झाली होती. तर आवाजामुळे अनेकांना त्रासही होत होता. रात्री उशीरा दोन्ही मंडळाच्या गणेशमुर्ती विसर्जनस्थळी पोहोचल्या‌. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. डिजेचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणला होता. गणेशभक्तांनी विसर्जनावेळी मोठी गर्दी केली होती. १७ व्या दिवशी भक्तिभावाने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.  दरम्यान, शहरात अजूनही २१ दिवसांचे तीन सार्वजनिक गणपती आहेत. तर १९ व्या दिवशी पोलिसांच्या गणपतीच विसर्जन होणार आहे.